आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: शेतकऱ्याने केला जिल्हाधिकारी कार्यालयात आत्महत्येचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादामुळे कंटाळलेल्या वडजी (ता. वाशी) येथील एका शेतकऱ्याने मंगळवारी (दि. २०) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी झाडावर चढल्यानंतर पोलिसांसह अधिकाऱ्यांची मोठी पळापळ झाली. सुमारे पाऊण तास समजावून सांगितल्यानंतर शेतकरी झाडावरून खाली उतरल्यामुळे सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. 

वडजी येथील शेतकरी माणिक विश्वनाथ मोराळे (सध्याचे वास्तव्य देवळाली, ता. कळंब) यांच्या बाजूने जमिनीच्या वादाचा न्यायालयाचा निकाल आहे. यासाठी ते निर्णयानुसार दीर्घ काळापासून फेरफारमध्ये दुरूस्तीची अंमलबजावणी करण्याबाबत मागणी करत आहेत. यासाठी ते सातत्याने वाशी तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या मारत होते. मात्र, त्यांच्या मागणीची कोणीही दखल घेतली नाही. यामुळे कंटाळून मोराळे यांनी मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. 

दुचाकी स्टँडजवळील एका उंच झाडावर मोराळे चढून बसले. त्यांना पाहून काही वेळातच मोठी गर्दी तेथे जमा झाली. जिल्हाधिकारी कार्यालय आनंदनगर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा ते पाऊण तास त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न सुरू हाेता. यादरम्यान पोलिसांची मोठी त्रेधा उडाली. सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मोराळे शेवटी खाली उतरले. तेव्हा सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला. 
अप्परजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा : अप्परजिल्हाधिकाऱ्यांनी मोराळे यांच्याशी चर्चा करून योग्य कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिल्याचे समजते. दरम्यान आनंदनगर पाेलिस ठाण्यात मोराळे यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

असाआहे वाद: वडजीशिवारातील आठ गटांमधील जमिनीसंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू होते. यातील उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोराळे यांच्या बाजूने निकाल दिला. मात्र, सीताबाई भाऊराव मोराळे यांच्या मृत्यूपत्रावरून फेर घेऊन सातबारा आठ वर रेकॉर्ड तयार केले आहे. न्यायालयाच्या निकालानुसार फेर दुरुस्त करून मिळण्यासाठी २०११ पासून ते पाठपुरावा करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...