आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-याची गळफास घेऊन आत्महत्या, मानवत तालुक्यातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - मागील दोन वर्षांपासून शेतातील नापिकी व बँकेच्या कर्जाचे डोक्यावर ओझे असलेल्या मानवत तालुक्यातील मंगरूळ (बु.) येथील अल्पभूधारक शेतक-याने बुधवारी (दि. ११) गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. गणेश वामनराव कदम ( ६०) असे या शेतक-याचे नाव आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगरूळ येथील गणेश वामनराव कदम यांना गावच्या शिवारात दोन एकर जमीन आहे; परंतु या जमिनीत मागील दोन वर्षांतील चारही हंगामांत नापिकी झाली. उत्पादनच न झाल्याने पैसाही हाती आला नाही. उलट, शेतात झालेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्जही फेडता आले नाही. कर्जफेडीच्या विवंचनेत ते मागील काही दिवसांपासून होते. बुधवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास ते घरातून बाहेर पडले; परंतु सकाळपर्यंत परत आलेच नाहीत. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्यांचा शोध घेतला असता सकाळी सातच्या सुमारास त्यांचा मृतदेह गावातील जुन्या मुस्लिम वस्तीतील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. रामपुरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. याबाबत गणेश कदम यांचा पुतण्या दत्तराव श्रीपतराव कदम यांच्या माहितीवरून मानवत पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.