आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याने गावकऱ्यांना सांगून घेतली फाशी, कर्जाच्या ओझ्यामुळे अात्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी - सततची नापिकी व कर्जाच्या ओझ्यामुळे खचलेल्या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुसरा (ता. वडवणी) येथे सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. मोतीराम सदाबा नाईकवाडे (६०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी सायंकाळी मोतीराम यांना आत्महत्या करण्यापासून ग्रामस्थांनी रोखले होते, परंतु सोमवारी पहाटे पाच वाजता पुन्हा शेतात जाऊन मोतीराम यांनी गळफास घेतला.

तालुक्यातील पुसरा येथील मोतीराम सदाबा नाईकवाडे (६०) हा शेतकरी सततच्या नापिकीला कंटाळला होता. माेतीराम यांना जवळपास दोन एकर शेती होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून दुष्काळामुळे मोठा खर्च व मेहनत करूनही शेतीतून उत्पादन येणे कठीण झाले होते. त्यातच त्यांच्यावर खासगी सावकाराचे काही व एसबीआय बँकेच्या वडवणी शाखेचे काही असे दोन्ही मिळून अडीच लाख रुपयांचे कर्ज होते. डोईवरच्या या कर्जाच्या ओझ्यामुळे स्वस्थपणे जगता येत नसल्याने मोतीराम यांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार घोळत होता. रविवारी रात्री “मी आत्महत्या करणार आहे,’ असे सांगून मोतीराम शेतात गेले होते. मात्र, गावकऱ्यांनी त्यांची समज काढून घरी परत आणले. परंतु आपल्यावरील कर्जाचा डोंगर कसा कमी होणार या विवंचनेतून मोतीराम प्रचंड तणावाखाली आले होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे पुसरा ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत होती.

गेल्या वर्षी पत्नीने केली होती अात्महत्या
मृत शेतकरी मोतीराम नाईकवाडे यांची पत्नी पद्मिनबाई नाईकवाडे यांनीही गेल्या वर्षी कर्जाच्या विवंचनेतूनच जून महिन्यात शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या दु:खाचे सावट ओसरत नाही तोच मोतीराम यांनीही याच झाडाला गळफास घेतला. या घटनेमुळे नाईकवाडे कुटुंबाला दुसऱ्यांदा या दु:खाला सामोरे जावे लागत आहे.
बातम्या आणखी आहेत...