आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कासावीस जीव विसावला काळ्या आईच्या कुशीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीक्षेत्र राजूर - तीन वर्षापासून निसर्ग एकापाठोपाठ हुलकावणी देत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सततच्या विवंचनेमुळे अनेकांनी मरणही पत्करले आहे. भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव थोटे येथील शेतकरी कल्याणराव थोटे (50) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवनयात्रा संपवली.

थोटे शेतीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांनी तीन एकर क्षेत्रावर कांदा, गहू, हरबरा पिकांची लागवड केली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या फटक्यामुळे पीक जमीनदोस्त झाले. पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान होऊनही शासनाकडून फक्त तीन हजार 600 रुपयांची मदत मिळाली. बॅँकेचे कर्ज व मुलीच्या लग्नाची चिंता त्यांना नेहमी सतावत असे. सन 2012 ते 2013 या वर्षात पावसाने दगा दिल्याने दुष्काळ पडला. यानंतर सन 2013 ते 2014 या वर्षात चांगला पाऊस झाला. खरीपाच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकºयांची परिस्थिती सुधारली. कापसाच्या उत्पन्नातून शेतकºयांनी गहू, ज्वारी, बाजरी, कांदा आदी रब्बीची पेरणी केली. विहिरींना मुबलक पाणी असल्यामुळे पीकही बहरले. परंतु अवकाळी पाऊस व गारपिटीने ते उध्वस्त झाले. या संकटातून सावरत धूळ पेरणी केली, परंतु रोहिण्या, मृग व आर्द्रा हे तिन्ही नक्षत्र कोरडे गेल्याने दुबार पेरणीचे संकट कोसळले.

गारपिटीतून सावरत थोटे यांनी कापसाची लागवड केली. परंतु जून संपूनही पाऊस न आल्यामुळे कापसाचे पीक सुकून चालले. या परिस्थितीचा सामना करताना ते हताश झाले होते. अल्प जमिनीच्या उत्पन्नावर मुलाचे शिक्षण व कुटुंबाचा उदारनिर्वाह चालवण्याची कसरत थोटे करीत होते. आर्थिक कोंडीतून सावरण्यासाठी तीन एकर जमिनीत एक एकर बियाण्याचा कांदा, दीड एकर गहू, अर्धा एकर हरबरा अशी लागवड केली होती. थोटे यांना पाच ते सहा क्विंटल काद्यांचे बियाणे तर 10 ते 15 क्विंटल गहू व चार ते पाच क्विंटल हरबरा झाला असता. मुलगा बीएससीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून, मुलगी लग्नाला आलेली आहे. हा सर्व प्रपंच शेतीच्या उत्पन्नावर चालवणे अवघड होऊन बसलेले असतानाच बॅँकेचे कर्ज व उदरनिर्वाह ही चिंता थोटे यांना सतावत होती.

- शेतीच्या उत्पन्नावरच घर संसार चालत असे. परंतु दुष्काळ व गारपीट अशा परिस्थितीत बॅँकेचे कर्ज त्यातच मुलाचे शिक्षण, व मुलीचे लग्न अशी बिकट परिस्थिती ओढविल्यामुळे काकांनी कर्जामुळे विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशांत थोटे, थोटे यांचा पुतण्या, पिंपळगाव थोटे कुटुंबीयांची काळजी आत्महत्याग्रस्त कल्याणराव थोटे यांचा मुलगा विकास थोटे पुणे येथे बीएससी वर्गाच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. शेती शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे निसर्गाच्या भरवशावरच वर्षभराची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्याचा अटोकाट प्रयत्न थोटे अखेरपर्यंत करत होते.

- पिंपळगाव थोटे येथील कल्याणराव थोटे या शेतकºयाने कर्जापोटी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे समजते. या संदर्भातील प्राथमिक अहवाल तहसील कार्यालयास पाठविण्यात आला असून, सविस्तर पंचनामा तत्काळ करण्यात येईल.
पी. यू. कुळकर्णी, मंडळ अधिकारी, राजूर