आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याने मागितली आत्महत्येची परवानगी, महिला शेतकऱ्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- कर्जाचे पुनर्गठन होत नसल्याने हिमायतनगर तालुक्यातील एकांबा येथील इंदुमती वसंतराव खंदारे या महिलेने थेट मुख्यमंत्री, गृहमंत्री व कृषिमंत्री यांना निवेदन पाठवून आत्महत्येची परवानगी मागितली आहे.
एकांबा येथे इंदुमती यांच्या मालकीची ३ हेक्टर ८५ आर जमीन आहे. त्यांनी जून २०१२ मध्ये खरिपासाठी हिमायतनगर येथील स्टेट बँक इंडियाकडून १ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले. परंतु चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळामुळे नापिकी होत असल्याने त्या कर्जाची परतफेड करू शकल्या नाहीत. कर्जाचा बोजा वाढतच गेला. या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जाचे पुनर्गठन करण्याची घोषणा केली. या वर्षी कर्जाचे पुनर्गठन होऊन आपल्याला नव्याने कर्ज मिळेल, अशी त्यांना आशा होती. त्या हिमायतनगर शाखेत कर्जाचे पुनर्गठन करण्याची मागणी घेऊन गेल्या. तथापि, शाखाधिकारी किशोरचंद्र जैन यांनी "शासनाने केवळ २०१४ च्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश दिले, तुमचे कर्ज जुने आहे, त्यामुळे त्याचे पुनर्गठन करता येणार नाही,' असे सांगितले.

सिटूचा आंदोलनाचा इशारा
शासनाचे आदेश असतानाही बँक कर्जाचे पुनर्गठन करून नव्याने पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे. सामान्य शेतकऱ्यांंच्या हालअपेष्टा होत आहेत. गरीब शेतकरी बँकेत चकरा मारून त्रस्त होत आहेत. शेतकऱ्यांना त्वरित पीक कर्ज द्यावे या मागणीसाठी सिटूच्या वतीने दि. १४ पासून स्टेट बँकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन जिल्हाध्यक्ष दिगंबर काळे यांनी तहसीलदार शरद झडके यांना दिले आहे.
बँकेचे नियम वेगळे कसे?
बाजूच्या उमरखेड तालुक्यात स्टेट बँकेने कर्जाचे पुनर्गठन केले आहे. ज्यांचे झाले नाही त्यांना बँकेत बोलावून कर्जवाटप सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुनर्गठनाचा पर्याय ठेवला आहे. मात्र शाखाधिकारी आपल्या मर्जीनुसार नियम पुढे करून कर्ज पुनर्गठित करण्यास टाळाटाळ करीत आहेत. स्टेट बँकेचे दोन तालुक्यांत वेगवेगळे नियम कसे? इंदुमती वसंतराव खंदारे, शेतकरी, एकांबा
कर्मचाऱ्यांची कमतरता
बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. शासनाचे आदेश गेल्या वर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आहेत. इंदुमतीबाईंना त्यांच्या जुन्या कर्जाची कागदपत्रे शोधण्यास विलंब लागेल. त्यात काय करता येईल, असे सांगितले होते. शेतकऱ्यांना कर्ज लवकर मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु अपुरा कर्मचारी वर्ग व वाढती शेतकऱ्यांची संख्या यामुळे थोडा विलंब होत आहे.
किशोरचंद्र जैन, शाखाधिकारी, एसबीआय, हिमायतनगर
आत्महत्या करण्याची परवानगी मागितली
स्टेट बँक ऑफ इंडिया येथील शाखाधिकाऱ्याच्या उत्तराने हताश झालेल्या इंदुमती यांनी अखेर नाइलाजाने मुख्यमंत्री, गृहमंत्री, कृषिमंत्री यांना निवेदन पाठवून एक तर कर्जाचे पुनर्गठन करा अथवा अात्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी केली. सातत्याने पडणारा दुष्काळ, नापिकी यामुळे कर्ज भरणे मला शक्य नाही. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.