आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक वाचवण्याचा प्रयत्न; तरुण शेतकरी दगावला, एक गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - विद्युत खांबावर तार जोडणी (झंपरिंग) करताना अचानक विद्युत प्रवाह सुरू होऊन पिकांना वाचवण्याच्या प्रयत्नातील युवा शेतकऱ्याचा खांबावरच चिकटून मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही हृदय हेलावून टाकणारी घटना तालुक्यातील बोडखा शिवारात गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.

कृष्णा रमेश भागडे (३१, रा. बोडखा) असे मृताचे नाव असून नारायण लोंढे हे गंभीर जखमी झाले. त्यांना फुलंब्रीतील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. अस्मानी संकटाने आधीच खचलेल्या शेतकऱ्यांचे सुलतानी संकटही पिच्छा सोडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे बळी जात असल्याने शेतकऱ्यांनी महावितरणवर रोष व्यक्त केला. कृष्णा भागडे, त्याचा भाऊ भगवान आणि काही शेतकरी गुरुवारी रात्री पिकांना पाणी देण्यासाठी गेले. गट नं.२०१ मधील शेतातील लागवड केलेल्या कांद्याच्या पिकाला कृष्णा आणि त्यांचा भाऊ पाणी देत होते. दरम्यान, विजेच्या लपंडावानंतर काही काळ वीजपुरवठा बंद झाला. त्यामुळे कृष्णा भागडे हा वीज तार जोडण्याकरिता ११ केव्हीच्या प्रवाहाच्या कटपॉइंट खांबावर चढला, तर काही अंतरावरील एका खांबावर नारायण लोंढे चढले. दरम्यान, अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने खांबावरच ताराला चिकटून कृष्णा भागडेंचा मृत्यू झाला. या वेळी खांबावर शॉर्टसर्किटचा मोठा आवाज होऊन आगीचा भडका उडाल्याने शेताच्या परिसरातील शेतकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याची माहिती गावातही पसरल्याने ग्रामस्थांनी धाव घेतली, परंतु जळालेला मृतदेह तारावरच चिकटलेला असल्याने हतबल झाले.
या घटनेची बाजारसावंगीच्या विद्युतपुरवठा उपविभागाला माहिती देऊन वीजपुरवठा बंद करायला लावला. गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास पोलिस निरीक्षक शिवलाल पुरभे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी येऊन अग्निशामक दलाच्या पथकाकडून कृष्णाचा जळालेला मृतदेह खांबावरून खाली उतरवला. पोलिसांनी या वेळी पंचनामा केला असून घटनास्थळावरच बाजारसावंगी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी शवविच्छेदन केले.

फीडरवर लोड
फीडरवर जास्त लोड असल्याने सुरळीत वीजपुरवठा हाेऊ शकत नाही. मृत शेतकऱ्याने आमच्याशी कोणताही संपर्क केला नव्हता.
एस. डी. जाधव, सहायक अभियंता, विद्युतपुरवठा उपविभाग, बाजारसावंगी.
बातम्या आणखी आहेत...