आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Harass In Marathwada Of Government Recovery

ब्रिटिशकालीन पैसेवारी शेतकर्‍यांच्या मुळावर; रद्द करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- पैसेवारी काढण्यासाठी ब्रिटिशकालीन निकषांवर आधारित पीक कापणी प्रयोग स्वातंत्र्यानंतरही सुरू आहे, परंतु बदललेल्या निसर्ग चक्रामुळे शेती आतबट्ट्यात आली आहे. शिवाय बहुपीकपद्धती रूढ झालेली असताना पैसेवारीची जुनी पद्धत शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरत आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या सुधारित पैसेवारीत जिल्ह्यातील आठ पैकी चार तालुक्यांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त काढण्यात आली आहे. वास्तविक या तालुक्यांत दुष्काळी स्थिती असताना पैसेवारीतून सारे काही अालबेल दाखवण्यात आल्याने शेतकरी शासकीय सवलतींपासून वंचित राहणार आहेत.

जिल्ह्यात उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, परंडा आणि वाशी या आठ तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात एकूण ७३७ गावे असून पैकी यातील निम्मी गावे खरिपासाठी व निम्मी गावे रब्बीसाठी पूर्वीपासून ग्राह्य धरण्यात येतात. परंतु अल्प कालावधित येणाऱ्या पिकांमुळे एकाच क्षेत्रावर खरिपासह रब्बीचीही पिके घेण्यात येतात, परंतु संबंधित गावाची ज्या हंगामासाठी निवड झाली त्याच हंगामातील पैसेवारी काढण्यात येते. गारपिटीपूर्वी पडलेल्या दुष्काळात अनेक गावांचे नुकसान होऊनही ते मदतीपासून वंचित आहेत.

पावसाळ्यात ४२१ मि.मी.ची नोंद
जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ७६७ मि.मी. अाहे. या वर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान एकूण ४२१.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. याची टक्केवारी ५४ एवढी होते. कागदावरील पाऊस ५० टक्क्यांपेक्षा अधिक दिसत असला तरी चार महिन्यांत अनेकवेळा पावसाने दडी मारली. प्रामुख्याने जून महिला कोरडा गेला. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या उशिरा झाल्या. शिवाय पिकांच्या वाढीच्या काळातच पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरिपाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले. सप्टेंबरनंतर साधारण ४ ते ५ टक्के पाऊस झाला; परंतु यामुळे शेतीचा फायदा होण्याऐवजी नुकसानच झाले.

आक्षेप देण्याची व्यवस्था
गावाच्या समितीने पैसेवारीचा अहवाल तयार केल्यानंतर तहसीलदारांकडून हा तात्पुरता अहवाल ग्रामस्थांच्या माहितीसाठी दिला जातो. त्यासाठी शेतकरी प्रतिनिधी यांना त्याची माहिती दिली जाते, िशवाय चावडीमध्ये हा अहवाल प्रसिद्ध करावा लागतो. त्यावर आक्षेप मागवले जातात. शेतकऱ्यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर त्यावर तहसीलदार विचार करतात त्यानंतर अंतिम अहवाल प्रसिद्ध केला जातो. डिसेंबरच्या १५ तारखेपर्यंत अंतिम अहवाल जाहीर करण्यात येणार आहे.

पैसेवारीची कहाणी; भातावरून शिताची परीक्षा...

1 पैसेवारी काढण्याची पद्धत ही भातावरून शिताची परीक्षा काढण्याचा प्रकार असल्याचे दिसून येते. विशिष्ट प्लॉट निवडून त्यातील पिकांची कापणी करून आलेल्या उत्पादनाची तुलना हेक्टरशी केली जाते. त्यानुसार त्या मंडळाची आणेवारी निश्चित करण्यात येते. परंतु पीक कापणीसाठी निवडलेल्या क्षेत्रातील पिकाच्या आणेवारीत विविध पातळ्यांवरून हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2 तहसीलदारांकडून प्रत्येक गावात एक ग्राम पीक पैसेवारी समिती गठित केली जाते. मंडळ निरीक्षक या समितीचा अध्यक्ष असतो. यात तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, सोसायटीचे अध्यक्ष सदस्य असतात. शेतकरी प्रतिनिधी म्हणून प्रगतिशील शेतकऱ्यांचा समावेश असतो. दरम्यान, जुनी पद्धत बदलून पेरणी ते काढणीपर्यंतचा खर्च, मिळालेले उत्पन्न, पावसाचे महिनानिहाय प्रमाण, नैसर्गिक आपत्ती आदींचा विचार होणे गरजेचे आहे.

3 पैसेवारी काढण्यासाठी पिकांचे १२ प्लॉट निवडले जातात. त्यात सांख्यिकी विभागाच्या माहितीनुसार हाती आलेल्या उत्पन्नाचे गेल्या १० वर्षंाच्या त्या पिकांच्या सरासरी उत्पादनाशी तुलना केली जाते. पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्यास दुष्काळ समजून मदत देण्याचा निर्णय घेतला जातो, परंतु निसर्गाचे चक्र बदलल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकरी कर्जबाजारी असताना चुकीच्या पैसेवारी पद्धतीने सरकारकडूनही मदत मिळत नाही.

4 महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ चे कलम ७८ नुसार, पैसेवारीच्या अनुपातानुसार, जमीन महसूल तहकूब, कमी वा रद्द करण्यास समर्थन म्हणून महसूल विभाग कोरडवाहू, खरीप व रब्बी पिकांची पैसेवारी काढीत असतो. यालाच पूर्वी आणेवारी असा शब्द प्रचलित होता. आणेवारीची ही पद्धत बदलण्यासाठी याआधी १९६२, १९७१ व १९७६ मध्ये समित्यांनी चर्चा केली गेली. परंतु जुनीच पद्धत राबवल्याचे दिसून येते.
५० पैक्षा कमी आणेवारी असल्यास...
>वीज देयकात ३३ टक्के सूट
> परीक्षा शुल्कात सवलत
> पीक कर्जात सवलत
> शेतसारा होतो माफ
>रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होतात.
^पैसेवारी काढण्याच्या पद्धतीत प्रशासनाचा हलगर्जीपणा दिसून येतो. आकडेवारी कमी आल्यास सर्वांना भरपाई देणे शक्य होत नाही. यामुळे अल्पभूधारक व केवळ शेतीवर उदरनिर्वाह असणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होते. जुनी पद्धत बदलून नवीन पद्धतीने आणेवारी काढावी.
-संभाजी भांडवले, शेतकरी, वाशी.