आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात शेतमालाचे भाव पडले, बुधवारी दुपारपर्यंत गोंधळाचे वातावरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मोंढ्यात आठवडाभरापासून दिवसाकाठी ४-५ कोटींची उलाढाल होत आहे. मंगळवारी १९ हजार क्विंटलची आवक होती व यातून ४ कोटींची उलाढाल झाली होती. मात्र, बुधवारी दुपारपर्यंत गोंधळाचे वातावरण राहिले. माल खरेदी करायचा की नाही यावरच खल सुरू होता. दुपारनंतर सर्व शेतमालाची खरेदी करण्यात आली. मात्र, त्यांना पैसे नेमके द्यायचे कसे अर्थात नोटांचा विषय आला. यावर सायंकाळपर्यंत नुसती चर्चाच सुरू होती. नोटा रद्दच्या या निर्णयामुळे शेतमालाचे भावही पडले. दरम्यान, दररोजपेक्षा अर्धीच उलाढाल झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

जालना ही व्यापारीपेठ असल्यामुळे मोंढा, एमआयडीसीसह शहरातील होलसेल-रिटेल विक्रेत्यांकडे मोठे व्यवहार होतात. पेट्रोल पंपांवर एरवी १००, २०० रुपयांचे पेट्रोल भरणाऱ्या वाहनचालकांना थेट ५००, १००० रुपयांचे पेट्रोल-डिझेल भरावे लागले. बुधवारी जवाहरबाग परिसरातील भाजीपाला बाजारातही सुटे पैसे नसल्यामुळे अनेक ग्राहकांना परत जावे लागले. शेतकरी असो की व्यापारी त्यांच्याकडे परत देण्यासाठी सुटे पैसेच नसल्यामुळे ग्राहकांना भाजीपाला न घेता घरी जावे लागले. हीच स्थिती जनरल स्टोअर्स, ऑप्टिकल्स, मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकान, शूज विक्रेते आदी छोट्या-छोट्या व्यावसायिकांकडे होती.

एकाही खरेदी-विक्री व्यवहाराची नोंद नाही
जालना येथील उपनिबंधक कार्यालयात बुधवारच्या तारखेतील एकही जमीन, प्लॉट, फ्लॅटच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला नाही. बँक बंद असल्यामुळे मुद्रांक चलन काढता न आल्यामुळे अनेक खरेदीदार-विक्रेते कार्यालयातून परत गेले. मंगळवारी ज्यांनी चलन काढले होते, असे १७ व्यवहार झाले. यातून शासनाला एक लाख ६० हजारांचा महसूल मिळाला. दरम्यान, बँका बंद असल्याने चलन भरता न आल्यामुळे एकही व्यवहार झाला नसल्याचे स्टॅम्प व्हेंडर कृष्णा ठोंबरे म्हणाले.

फळ पीक विमा भरण्याची आज अंतिम तारीख
१० नोव्हेंबर २०१६ ही फळ पीक विमा भरण्याची अंतिम तारीख अाहे. बुधवारी बँका बंद राहिल्यामुळे शेतकऱ्यांना विमा हप्ता भरता आला नाही. यामुळे गुरुवारी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फळ पीक विमा हप्ता भरून घेण्यासाठी बँकांनी नियोजन केले.
बातम्या आणखी आहेत...