आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतक-याने बँकेतच केले विष प्राशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - पीक विम्याची मंजूर झालेली रक्कम काढण्यासाठी बॅँक खाते उघडण्याकरिता बँक कर्मचारी टाळाटाळ करत असल्याच्या कारणावरून शेतक-याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टाऊन हॉल (जुना जालना) शाखेत हा प्रकार घडला. बालाजी जगन्नाथ चौधरी (४२, दरेगाव, ता. जि. जालना) असे शेतक-याचे नाव आहे. दरम्यान, बालाजी चौधरी यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बालाजी चौधरी यांनी मागील वर्षी कापसाचा पीक विमा हप्ता भरला होता. चालू वर्षात पीक विम्यापोटी ५ हजार ८०० रुपये चौधरी यांना मंजूर झाले. ही रक्कम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टाऊन हॉल येथील शाखेत जमा झाल्याचे समजले. यावरून बालाजी यांनी बँकेत जाऊन विचारणा केली असता, त्यांना ही रक्कम काढण्यासाठी खाते उघडण्यास सांगितले. त्यानुसार बालाजी हे १ जुलैपासून दररोज बॅँकेत खाते उघडण्यासाठी येत होते. मात्र, संबंधित बँक कर्मचारी खाते उघडण्यासाठी चालढकल करत होते. मंगळवारीही नंतर या, असे सांगितले. सात दिवसांपासून चालढकल सुरू असल्याने त्यांनी विष घेतले.
गावनिहाय विमा रक्कम वाटप नियोजन
बालाजी चौधरी याला खाते उघडण्याचा फॉर्म दिला होता व १४ जुलै रोजी येण्यास सांगितले होते. तो बँकेचा थकबाकीदार नाही व त्याला कुणी त्रासही दिलेला नाही. पीक विम्याची रक्कम गावनिहाय देण्याचे नियोजन आहे.
सी.बी. खरात, शाखा व्यवस्थापक, जिल्हा मध्यवर्ती बँक जालना