आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारी शेतकऱ्याची बारसवाडा येथे आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडीगोद्री- दुष्काळी परिस्थिती व डोक्यावरील कर्जाच्या चिंतेमुळे बारसवाडा (ता.अंबड) येथील शिवाजी वैद्य (३६) या शेतकऱ्याने सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास राहत्या घरी फाशी घेऊन आत्महत्या केली.

अंबड तालुक्यातील बारसवाडा येथील सरपंच सगुनराव आसाराम वैद्य यांना तीन एकर जमीन असून सहा वर्षांपासून त्यांचा एकुलता एक मुलगा शिवाजी वैद्य हा घर व शेतीचा कारभार पाहत होता. जमीन कमी त्यातून निसर्गाने पाठ फिरवल्याने उत्पादन दरवर्षी कमी होत होते. अशा परिस्थितीत स्टेट बँक आॅफ इंडियाचे चार लाख कर्ज, सहकारी सोसायटीचे ६० हजार व चिखली अर्बन बँकेेचे ५० हजार रुपये कर्ज झाले होते. मात्र, उत्पन्नाचा मार्ग नसल्याने कर्जाचे व्याज फेडणेही शक्य होत नव्हते. त्यामुळे वैतागलेल्या शिवाजी वैद्य यांनी तीन जुलै रोजी पहाटे तीनच्या सुमारास राहत्या घरी पंख्याला दोर बांधून गळफास घेतला. त्यांची पत्नी सिंधूबाई व मुलगा योगेश यांना पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. घटनेची माहिती मिळताच गोंदी पोलिस ठाण्याचे पोलिस हेड कॉन्स्टेबल आहेर, सानप यांनी भेट देऊन पंचनामा केला. तसेच वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. मृत शिवाजी वैद्य यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली व आई-वडील असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार राजेश टोपे यांनी सरपंच सगुनराव वैद्य व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. तहसीलदार महेश सावंत, कृषी अधिकारी तारगे, मंडळ कृषी अधिकारी काळे यांनीही शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली.
बातम्या आणखी आहेत...