आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापुरात शेतकऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - तालुक्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना दुष्काळी अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी लाच देऊन दोन महिने उलटूनही हक्काचे अनुदान मिळत नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी ४० ते ५० शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने प्रशासनाची एकच धावपळ उडाली.

तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दुष्काळी अनुदानाची रक्कम येऊन तीन महिने होऊनही तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये अनुदान वाटप करण्यात आलेले नाही. अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना महसूलच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पाठीमागे फिरावे लागत आहे. प्रसंगी काही ठिकाणी रोख स्वरूपात लाचदेखील घेतली जात आहे. त्यामुळे आज जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिरेसायगाव सजामधील पाच गावांतील चाळीस ते पन्नास शेतकऱ्यांनी रॉकेलच्या बाटल्या हातात घेऊन तहसीलसमोर आंदोलनास सुरुवात केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी याप्रकरणी मध्यस्थी करून दोन दिवसांत अनुदान देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने पुढील अनर्थ टळला.

या आंदोलनामध्ये सभापती संतोष जाधव, सरपंच पोपटराव चव्हाण, विठ्ठल चव्हाण, बालचंद चव्हाण, बाळू कर्डक, पांडू काकडे, दशरथ कांबळे यांच्यासह चाळीस ते पन्नास शेतकरी सहभागी झाले होते.

वजनापूर अनुदानापासून वंचित : या वेळी शेतकऱ्यांनी तालुक्यातील सिरेसायगाव सजाअंतर्गत असलेल्या ५ गावांपैकी वजनापूर येथील एकाही शेतकऱ्याला आजपर्यंत अनुदानाची रक्कम मिळाली नसल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती यांनी तहसीलदार व संबंधितांकडे गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा केला होता; परंतु आश्वासनापलीकडे काही मिळाले नसल्याचा आरोप जाधव यांनी तहसीलदारांसमक्ष आंदोलनाप्रसंगी केला.

निलंबन प्रस्ताव
तलाठी नजन यांना निलंबित करण्याबाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला असून त्यांच्या जागी नवीन तलाठ्याची नेमणूक केली आहे. बुधवारपर्यंत (दि. ११) सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होईल, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले. या वेळी शेतकऱ्यांनी अनुदानासोबतच लाचेपोटी घेतलेल्या पाचशे रुपयांची रक्कमही देण्याची मागणी केली.

प्रत्येकी पाचशे रुपये लाच
वजनापूर येथील तलाठी ज्ञानेश्वर नजन यांनी अगोदर साहेबांना पैसे दिल्याशिवाय अनुदान मिळणार नाही, असे सांगितल्यावरून शेतकऱ्यांनी नजन यांच्याकडे जमिनीच्या क्षेत्राप्रमाणे प्रत्येकी दोनशे पन्नास ते पाचशे रुपयांप्रमाणे रक्कम दिली असून दोन महिने उलटूनही अनुदान मिळत नसल्याने आत्मदहनाचे टोकाचे पाऊल उचलावे लागत असल्याचे या वेळी आंदोलकांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...