आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ, गारपिटीला वैतागून गळफास!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - जुलै सुरू झाला तरी पाऊस नाही. पेरणी, लागवड खोळंबली. पाऊस नाही आला तर पुढे काय, हा विचार असह्य झाल्याने चार एकरांचे मालक असलेल्या अंकुश कुटे (45) यांनी जीवनयात्रा संपवल्याचे वास्तव समोर आले आहे. शनिवारी, 28 जून रोजी पहाटे त्यांनी राहत्या घराच्या लाकडी आढय़ाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

शेतकरी आत्महत्येचे लोण आता सुपीक भागापर्यंत पोहोचले आहे. जायकवाडी धरण कालव्याच्या ओलिताखाली असलेल्या मारफळा गावातील शेतकर्‍याने दुष्काळ, नापिकी व गारपिटीने झालेल्या नुकसानाला वैतागून गळफास घेत जीवनयात्रा संपवली. सलग तीन वर्षे निसर्गाची अवकृपा सहन केलेल्या शेतकर्‍यांना आता लांबलेला मान्सून मात्र असह्य होऊ लागल्याचे अशा घटनांतून दिसून येत आहे. अंकुश देवराव कुटे मारफळा या गावी आपल्या कुटुंबीयांसह राहणारे शेतकरी. घरात पत्नी व दोन सज्ञान मुले. एका मुलीचे लग्न झालेले. सलग तीन वर्षांपासून शेती पिकेना. कधी दुष्काळ, तर कधी गारपीट अशा अस्मानी संकटांनी घेरलेल्या शेतकर्‍यांचे अंकुश कुटे हे दुर्दैवाने प्रतिनिधीच. शेतीत उत्पन्न नसल्यामुळे खर्चासाठी वारंवार खासगी सावकाराचे कर्ज घ्यावे लागले. शेती पिकेल या आशेने कर्ज घेतले, पण शेतीत काहीच पिकले नाही. आता प्रपंच भागवून कर्ज कसे फेडायचे, असा प्रश्न कुटे यांच्यासमोर उभा होता.

चोहोबाजूंनी निराशाजनक वातावरण झाल्यामुळे अंकुश कुटे यांनी परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केली. शेतकर्‍यांच्या अडचणींची चर्चा भरपूर होते, पण अंमलबजावणीचा दुष्काळ कधीच दूर होत नाही. वर्षानुवर्षे असे अनुभव आल्यावर शेतकरी शेवटी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत, परंतु शेतकर्‍यांनी असा दुर्दैवी निर्णय घेण्याऐवजी संघटित होऊन परिस्थितीचा मुकाबला करावा, असे देविदास कुटे (मृत शेतकर्‍याचे भाऊ) म्हणाले.