आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर/गेवराई/सिल्लोड - हातातोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे गेल्याने सिल्लोड, तुळजापूर आणि गेवराई तालुक्यांतील तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. गजानन सांडू उबाळे (26, रा. अंधारी, ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), नाना ज्ञानदेव कदम (47, रा. पिंपळा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) आणि श्रीराम गणपत कोकाटे (25, रा. ठाकर आडगाव, ता. गेवराई, जि. बीड) असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची नावे आहेत.

सोमवारी दुपारी अंधारी गावास पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत गजानन उबाळे यांचा मृतदेह आढळला. शेतीवरवरच त्यांच्या कुटुंबाची उपजीविका चालत होती. मात्र, गारपिटीने नुकसान झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. नाना कदम यांच्याकडे बँकेचे 4.5 लाख रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते होते. त्यामुळे सोमवारी (दि.24) सायंकाळी 4 वाजता गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

ठाकर आडगाव येथील श्रीराम कोकाटे यांची दीड एकरातील मोसंबीची बाग गारपिटीने उद्ध्वस्त झाली. गव्हाचेही मोठे नुकसान झाले. त्यातच कर्ज कसे फेडायचे, या चिंतेत 20 मार्च रोजी कोकाटे घरातून बाहेर पडले. दोन दिवसांनंतर रविवारी रात्री कोकाटेंचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला. विष प्राशन करून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.