हिंगोली - दीड एकर शेती आणि त्यातील पीकही जास्त पावसामुळे खराब झाले. तीन मुलांचा उदरनिर्वाह आणि इतर खर्च कसा करावा या चिंतेतून वसमत तालुक्यातील कोठारी येथे तरुण शेतकरी दांपत्याने विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची घटना मंगळवारी दुपारी ४.३० वाजता घडली.
बालाजी माधवराव पतंगे (३२) व त्याची पत्नी वर्षा (२८) असे आत्महत्या केलेल्या दांपत्याचे नाव आहे. बालाजीला तीन मुले असून ती शाळेत जातात. बालाजीला दीड एकर शेती असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या वर्षी नापिकी आणि या वर्षी जास्त पाऊस झाल्याने त्यांच्या दीड एकरातील सर्व पीक खराब झाले. आता काही खरे नाही आणि आपली गरिबी काही संपत नाही, असा विचार करून या दांपत्याने मंगळवारी दुपारी ४.३० वाजता कोठारी गावातीलच नेमाजी नरवाडे यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृताच्या मामाच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोंद घेतली.