आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जावर दुबार पेरणी केली; तरीही पीक न जगल्याने शेतक-याची विहीरीत उडी घेऊन आत्‍महत्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - खासगी कर्ज काढून दोनदा पेरणी केल्यानंतरही पावसाअभावी पीक न उगवल्याने नैराश्यातून एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना जवळा झुटा (ता. पाथरी) येथे घडली. गेल्या पंधरा दिवसांत जवळा झुटा गावातच ही तिसरी आत्महत्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
 
जवळा झुटा येथील चंडिकादास सुखदेव एडके (३५) हा तरुण शेतकरी गेल्या चार दिवसांपासून घरातून गायब होता. नातेवाइकांनी त्याचा शोधही घेतला. गुरुवारी सकाळी शिवारातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलिसांनी पंचनामा केला. या वेळी त्याचे वडील सुखदेव एडके यांनी पोलिसांना माहिती दिली. आपल्याला तीन एकर शेती असून तीन मुले आहेत. प्रतिवर्षी  शेत एका मुलाकडे वहितीसाठी दिले जात असे.  यावर्षी चंडिकादास हा शेती करत होता. खासगी कर्ज काढून पेरणी केली. मात्र, पाऊस पडला नसल्याने शेतात पेरलेले उगवले नसल्याने तो नैराश्यात होता. त्यातूनच ही आत्महत्या त्याने केल्याचे वडिलांनी सांगितले.  
 
जवळा झुटा गावात पंधरा दिवसांत तीन आत्महत्या झाल्या. काकाच्या आत्महत्येनंतर एका मुलीने आठ दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यानंतर ही आत्महत्या घडल्याने दुष्काळाची दाहकता दिसून येत आहे.

काका-पुतणीने संपविले जीवन...  
जवळा झुट्यात काकाने कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केल्यानंतर ते दु:ख सहन न झाल्याने तसेच आपल्याही वडिलांवर ही वेळ येऊ नये, या भावनेतून पुतणीने केलेली आत्महत्या तर मनाला चटका लावून जाणारी ठरली आहे. चंडिकादास झुटे (४५) यांना १३ एकर जमीन होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत आर्थिक प्रश्नांना सामोरे जाताना त्यातील ६ एकर जमीनही त्यांनी विकली होती. त्यातच मुलीच्या लग्नासह उदरनिर्वाहासाठी तीन बंॅकांकडून कर्ज घेतले होते. मागील वर्षाचा अपवाद वगळता त्याआधीची तीन वर्षे मोठ्या दुष्काळास तोंड द्यावे लागलेले. त्यामुळे कर्ज फेडीचाही प्रश्न समोर होता. त्यातून चंडिकादासराव यांनी ४ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली.  

सुसाइड नोटमधून कारण स्पष्ट ...  
चंडिकादास झुटे यांच्या आत्महत्येनंतर चारच दिवसांनी पुतणी सारिका झुटे (१७) हिने घरातील मंडळी बैठकीत शोकाकुल अवस्थेत असताना ८ ऑगस्ट रोजी गळफास घेत जीवन संपविले. तत्पूर्वी, तिने लिहिलेल्या सुसाइड नोटमधून तिने आपल्या आत्महत्येमागील कारणही स्पष्ट केले. काकाच्या जाण्याचे दु:ख सहन झाले नाही. बारावीत असलेली सारिका काकाचे हिशोब डायरीत लिहिण्याचे काम करीत असे. त्यामुळे तिला आर्थिक स्थितीची पूर्ण जाण होती. त्यातच चुलत बहिणीच्या लग्नासाठी काकाने काढलेल्या कर्जाच्या बोज्याचीही तीला माहिती होती. आपल्याही वडिलांवर ही वेळ येऊ नये, अशी भीती व्यक्त करीतच तिने आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट केले.  

पिकांना पाळ्याही घातल्या...  
यंदा पाथरी तालुक्यात विशेषत: पश्चिम भागात असलेल्या कासापुरी, नाथरा, पाथरगव्हाण बुद्रुक, पाथरगव्हाण खुर्द, निवळी, डोंगरगाव, हादगाव, वडी या गावांत पाऊसच झाला नाही. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, नंतर गायब झालेला पाऊस ऑगस्टपर्यंत आलाच नाही. परिणामी, शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग व कापसाला पाळ्या घालून पिके काढून टाकत रानं मोकळी केली आहेत. रब्बीत खाण्यापुरती ज्वारी तरी घेऊ, या मानसिकतेतून या भागात रानं उनाड केली गेली आहेत. उत्तरेकडच्या भागातही अशीच स्थिती आहे.  
 
संपूर्ण गावच शेतीवर : पाथरी शहरापासून पश्चिमेकडे २२ किलोमीटर अंतरावर असलेले जवळा झुटा हे गाव अत्यंत आडवळणाला आहे. गावची लोकसंख्या १६०० च्या आसपास असून संपूर्ण गावच शेतीवर अवलंबून आहे. यंदा पाणीच नसल्याने पिकांना पाळ्या घालण्याची वेळ आली. त्यामुळे या गावच्या शिवारात पिकेच दिसत नाहीत. ज्यांच्याकडे विहिरी वा बोअर आहेत, अशांनी कापूस, सोयाबीन जिवंत ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
बातम्या आणखी आहेत...