आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नुकसान पाहवले नाही; मराठवाड्यात आणखी तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली/बीड - शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच आता महिला शेतकरीही टोकाचे पाऊल उचलत आहेत. नुकसान पाहून धक्का बसल्याने माजलगाव तालुक्यात राजेवाडी येथे वनारसीबाई बाजीराव मुळे (60) या शेतकरी महिलेने पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. याशिवाय कर्ज आणि मुली, बहिणींच्या विवाहाच्या चिंतेत बीड व हिंगोलीतील आणखी तीन शेतकर्‍यांनी जीवनयात्रा संपवली. गोविंद दाढाळे (45, पार्डी, ता. वसमत), राजाराम जहरव (65, बाभूळगाव, सेनगाव) व अशोक ब्रिंगणे (22, नागदरा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) अशी या शेतकर्‍यांची नावे आहेत.

राजेवाडी येथे बाजीराव मुळे व पत्नी वनारसीबाई यांना दोन मुले असून, ते विभक्त राहतात. त्यांना सात एकर कोरडवाहू जमीन आहे. देणी चुकवण्यासाठी त्यातील दोन एकर जमीन वनारसीबाई यांनी विकली. उरलेली पाच एकर जमीन पती-पत्नी कसत होते. सोसायटीचे कर्ज कसे फेडणार, या चिंतेने वनारसीबाई (60) यांनी शनिवारी सायंकाळी घरातच अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. यात त्यांचा मृत्यू झाला.

गोविंद दाढाळे यांनी फवारणीचे औषध घेतले. कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्याकडे दीड एकर शेती असून, त्यांच्या मुलीचा 2 मे रोजी विवाह ठरला आहे. त्यासाठी पैसे नसल्याने ते हताश झाले होते.

चारपैकी तीन मुलींच्या विवाहाचे कर्ज असल्यामुळे राजाराम जहरव असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. जहरव यांनी रविवारी घरातच विष घेतले. गोरेगाव आरोग्य केंद्रात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जहरव यांच्या नावे तीन एकर शेती असून, एका मुलीचा विवाह व कर्जाची चिंता त्यांना होती. सोसायटीचे कर्ज आणि मोठय़ा बहिणीच्या विवाहाचा खर्च कसा भागवणार या विवंचनेत अशोक ब्रिंगणे यांनी रविवारी शेतात विष घेऊन आत्महत्या केली. अशोक यांची नागदरा येथे वडिलोपार्जित शेती आहे. रब्बीच्या भरवशावरच त्यांनी सोसायटीचे कर्ज आणि मोठय़ा बहिणीच्या विवाहाचे स्वप्न पाहिले होते.