आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीन जात असल्याने शेतकरी आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात जमीन जात असल्याने निराश झालेल्या शेेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली.
तालुक्यातील करचुंडी येथील मोहन गोपीनाथ कांगरे (५५) यांची कोळवाडी येथील अर्धा एकर जमीन धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणातजात हाेती. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन दिले होते. मात्र, निवेदनाची दखल न घेतल्याने त्यांनी बुधवारी दुपारी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, मुलगा असा परिवार आहे.
गळफास घेतला
घनसावंगी - तालुक्यातील माहेरजवळा येथील रामेश्वर सीताराम बर्डे (२५) या शेतकऱ्याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आल्याची माहिती ठाणे अंमलदार मदन यांनी दिली.
ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्याने विष घेतले
नांदेड - तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील मानेजी हिरामण मोरे (४०) या कर्जबाजारी शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मोरे यांनी खरीप हंगामासाठी पंजाब नॅशनल बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. परंतु पावसाअभावी सर्व पिके हातची गेली होती.

वीज तारेला पकडून जीवन संपवले
लातूर - तालुक्यातील मुशिराबाद येथील शेतकऱ्याने शेतातील विजेच्या तारेला पकडून आत्महत्या केली. अंतेश्वर शंकर पोतराजे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. अंतेश्वर यांच्या नावावर बोरी येथील मराठवाडा ग्रामीण बँकेचे कर्ज होते.

नापिकीला कंटाळून मरणाला कवटाळले
परभणी - बँकेचे कर्ज व शेतातील नापिकीला कंटाळून पारवा येथील शेतकऱ्याने बुधवारी घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. गणेश जानकीराम करपे (२२) असे त्याचे नाव आहे.