आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहानलेल्या ग्रामस्थांत \'श्रीमंत\' शेतकऱ्याने पाहिला पांडुरंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- प्रत्येकवर्षी कमी पडणाऱ्या पावसामुळे ओढवणारे दुष्काळाचे संकट, नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. पण बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील वारकरी असलेले शेतकरी श्रीमंत घरत यांनी स्वत:च्या पाच एकरातील भाजीपाल्याचे नुकसान झेलत गावासाठी पाच महिन्यांपासून बोअर खुला करून ग्रामस्थांची तहान भागवली आहे.

शासनाच्या अधिग्रहित बोअरवर दुष्काळात स्वत:ची शेती भिजवणारे महाभाग भरपूर आहेत. पण दुसरीकडे गावातील पाणीटंचाईचे संकट जाणून शासनाकडून एक रुपयाचीही अपेक्षा ठेवणारा श्रीमंत घरत नावाचा हा शेतकरी मनाने श्रीमंत आहे, हेच यावरून दिसून येते. बीड तालुक्यातील तेराशे लोकसंख्या असलेल्या महाजनवाडी गावातील वारकरी संप्रदायातील शेतकरी श्रीमंत चंद्रभान घरत यांना २२ एकर शेती असून त्यात १७ एकर शेती कोरडवाहू, तर पाच एकर शेती बागायती आहे.

शेतात विहीर नसल्याने पाणीटंचाईवर पर्याय शोधण्यासाठी त्यांनी २००९ मध्ये बोअर घेतला. योगायोगाने या बोअरला चांगले पाणी लागले. सध्या त्यांनी बोअरच्या पाण्यावर पाच एकर शेतीत उसाबरोबरच टोमॅटो, कांदा, मिरची, अद्रक आदी भाजीपाला घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक चौसाळा शाखेकडून त्यांनी काही वर्षांपूर्वी ७० हजार रुपयांचे उसासाठी घेतलेले कर्ज अद्याप फिटलेले नाही. अशा परिस्थीतीत मागील तीन वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळ तालुक्यातील शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर चांगला पाऊस होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. परंतु मागील अडीच महिन्यांपासून पाऊस नसल्याने बीड तालुका पाणीटंचाइचे संकट झेलत आहे. महाजनवाडी या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
भाजीपाल्याला पाणी देण्याएेवजी ग्रामस्थांची तहान भागवली पाहिजे हा उद्देश समोर ठेवून मागील पाच महिन्यांपासून ते गावची तहान भागवत आहेत. महाजनवाडीतील जवळपास ७५ टक्के लोक याच बोअरवरून पाणी नेतात.

आम्हाला अभिमान आहे
सध्यापाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत माणसाला पाणी देणे हे पुण्याचे काम आहे. आमच्या घरातील सर्व सदस्यांचा वडिलांना पाठिंबा आहे.
- मेघराज घरत, शेतकऱ्याचा मुलगा

तीन लाखांचा फटका
बोअरचेपाणी सध्या गावातील लोकांना देण्यात येत असल्याने शेतकरी श्रीमंत घरत यांच्या पाच एकर शेतीतील भाजीपाला सुकल्याने तीन लाखांचे नुकसान झाले आहे. परंतु आठ दिवसांपूर्वी पडलेल्या पावसावर थोडाफार भाजीपाला तरला आहे.

पंढरीची वारी
एकतरी ओवी अनुभवावी, असे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे. संतांच्या या उपदेशाप्रमाणे महाजनवाडी येथील वारकरी श्रीमंत घरत यांनी कृतीतून गावाची तहान भागवण्यासाठी स्वत:चा बोअर खुला केला आहे. मागील आठ वर्षांपासून ते चुकता पंढरीची वारी करत आहेत.