आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी आत्महत्या ही हत्याच, सुकाणू समितीच्‍या 10 ठाण्यांत सरकारविरुद्ध तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या या आत्महत्या नसून त्या हत्याच आहेत, असा आरोप करत शुक्रवारी बलिप्रतिपदेच्या दिवशी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने जिल्ह्यात दहा पोलिस ठाण्यांची गावे व शहरात  बळीराजाची मिरवणूक काढून जिल्ह्यातील दहा पोलिस ठाण्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.    

महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेवर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी त्या वेळी महाराष्ट्रातील वाढत्या शेतकरी आत्महत्येप्रकरणी विधानसभेत आघाडी सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. २०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा धरून आधारभूत किमती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र फडणवीस हे मुख्यमंत्री  होऊन तीन वर्षे उलटली तरी त्याची  अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.   आघाडी सरकारप्रमाणेच  फडणवीस सरकारही शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. एक जूनच्या शेतकरी संपानंतर ११ जून २०१७  रोजी देवेंद्र सरकारने सरसकट कर्जमुक्तीची घोषणा केली. सुमारे ३४ हजार कोटी रुपयांची कर्जे माफ केल्याचे सांगितले. मात्र आजपर्यंत एकाही शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला नसल्याने ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे.   शेतकऱ्यांच्या आत्महत्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने कलम ३०६  आणि ४२०  प्रमाणे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे नोंदवून तपास  करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावेत, अशी तक्रार सुकाणू समितीने    बीड जिल्ह्यातील अंभोरा, आष्टी, गेवराई, माजलगाव, बीड, वडवणी, सिरसाळा,परळी, अंबाजोगाई, केज या पोलिस ठाण्यात   दिली आहे. शुक्रवारी जिल्ह्यात सुकाणू समितीच्या वतीने तक्रार देण्यात आलेल्या पोलिस ठाण्याच्या गावात बळीराजाची मिरवणूक काढली.  शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष डॉ. आजिमुद्दीन शेख, प्रा. राम बोडखे, सुकाणू समितीच्या सदस्या प्रा. सुशीलाताई मोराळे, कुलदीप करपे, धनंजय मुळे, रामेश्वर गाडे, रघुनाथ नावडे, सुभाष मायकर, अनंत शिंदे, हनुमंत चाटे, संजय आपेट, विनोद बुरांडे, फत्ताह पटेल, भाई मोहन गुंड, जालिंधर देशमुख, मोहन लांब यांच्या पुढाकाराने  फडणवीस यांच्यावर तक्रार नोंदवली असून पोलिसांनी  या  तक्रारीची  स्टेशन डायरीला नोंद घेऊन तपासाला सुरुवात केल्याचे सांगितले.   

परभणी: कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक ऑनलाइन व शर्तींचा गोंधळ
सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्यासह त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडले तसेच शेतकऱ्यांचे खूनच केले आहेत, असा आरोप करत या कलमांनुसार सरकारवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने शुक्रवारी (दि. २०) जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयावर बळीराजाची मिरवणूक काढून निवेदन दिले.    

सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. या लुटीचा परतावा म्हणून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. सरकारने कर्जमुक्तीची घोषणा करताना आश्वासन व शब्द पाळले नाहीत, अनेक अटी लावत शेतकऱ्यांची घोर फसवणुक केली आहे. कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक ऑनलाइन व अटी-शर्तींचा गोंधळ घातला आहे. त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. अर्ज भरलेल्या ५८ लाख शेतकऱ्यांपैकी जे शेतकरी सरकारच्या अटींमध्ये बसतील त्यांनाच कर्जमाफीचा लाभ होणार आहे, त्यामुळे सरकारने  शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचेच काम केले आहे.
 
सुकाणू समितीने बाजार समितीतून बळीराजाची अभिवादन मिरवणूक वाजतगाजत काढली. मोंढा परिसर, स्टेशन रोड मार्गे ही मिरवणूक जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाली. जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी विलास बाबर, गणेश घाडगे, रोहिदास हरकळ, रामकिशन कदम, राजेभाऊ काकडे, नारायण अवचार आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते.

सरकारच जबाबदार 
शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासही सरकारनेच भाग पाडले आहे, असेही सुकाणू समितीने म्हटले आहे. या पार्श्;वभूमीवर सरकारवर फसवणुकीच्या कलम ४२० नुसार, आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल कलम ३०६ नुसार व शेतकऱ्यांच्या हत्या केल्याबद्दल कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सुकाणू समितीने केली.
बातम्या आणखी आहेत...