आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी राजाने अनुभवले मार्केटिंगचे तंत्रज्ञान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - शेतक-यांनी आडत, हमाली आणि तोलाईला फाटा देत थेट ग्राहकांना 3 हजार 848 क्विंटल धान्याची विक्री केली. ही किमया साधली सरकारच्या कृषी विभागातर्फे आयोजित धान्य महोत्सवात. या अभिनव उपक्रमातून शेतक-यांना मार्केटिंगचे तंत्रज्ञान अवगत झाले, तर ग्राहकांच्या चेह-यावर निर्भेळ धान्य मिळाल्याचे समाधान दिसले.
येथील टाऊन हॉलच्या मैदानावर 1 ते 3 मे या काळात धान्य महोत्सव पार पडला. त्याला लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. माल विक्रीतील दलाली थांबून शेतक-यांना आपला माल थेट ग्राहकांना विकता यावा आणि त्यांच्यात विक्री व उद्योजकीय कौशल्य वाढावे म्हणून हा उपक्रम पहिल्यांदाच लातुरात आयोजित करण्यात आला होता. शिवाय ग्राहकांच्या गरजा व अपेक्षाही शेतक-यांना समजाव्यात, असा यामागील उद्देश होता.


तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात 450 शेतक-यांनी 3 हजार 848 क्विंटल धान्याची विक्री केली. हा माल सात हजार ग्राहकांनी खरेदी केला. त्यातून 1 कोटी 28 लाखांची उलाढाल झाली. भाजीपाला, फळे, धान्य, प्रक्रियायुक्त पदार्थ, मसाले आदींचे जवळपास 60 स्टॉल्स लावण्यात आले होते. गहू, ज्वारी, तांदूळ, हरभरा, दाळी, गूळ, मिरची, हळद आदी 54 प्रकारचा थेट शेतातून आलेला माल म्हणून ग्राहकांनी खरेदी केला. पॅकिंगसाठी लागणा-या पिशव्या व गोण्या कृषी विभागाने मोफत दिल्या होत्या, तर स्टॉलचेही भाडेही घेण्यात न आल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. उत्पादकाकडून विश्वासाने माल मिळाल्याने त्याचे दरही किफायतीशीर होते. त्यामुळे ग्राहकराजा खुश झाला.
निवडलेला, स्वच्छ केलेला माल पॅकिंगमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. परिणामी ग्रेडिंग व पॅकिंग केलेले धान्य ग्राहकांना योग्य किमतीत मिळाले. तत्पूर्वी महोत्सवात आलेला माल कर्मचा-यांसमोर स्वच्छ करून
त्यावर कृषी विभागाचे लेबल लावण्यात आले. त्यानंतरच तो विक्रीसाठी ठेवण्यात आला. शेतकरी व ग्राहक यांच्यातील दुवा म्हणून नियोजनाचे काम कृषी कार्यालयाने केले.