आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmers Locked HDFC Bank Branch Because Of The Decline Agricultural Loans

एचडीएफसी बँकेच्या शाखेला ठोकले कुलूप, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे परभणीत आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - परभणी येथे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने एचडीएफसी बँकेच्या शाखेला मंगळवारी कुलूप ठोकण्यात आले. दत्तक गावातील शेतकर्‍यांना पीक कर्ज नाकारण्याच्या कारणावरून कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. छाया : योगेश गौतम

परभणी - दत्तक गावातील शेतकर्‍यांना पीक व कृषी कर्ज नाकारण्याच्या कारणावरून येथील एचडीएफसी बँकेच्या शाखेला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी कुलूप ठोकले. भाकपचे जिल्हा सरचिटणीस कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांनी बँक प्रशासनाचा निषेध नोंदविला.

पाथरी तालुक्यातील निवळी, गोपेगाव, मरडसगाव, रामपुरी, पाटोदा ही गावे एचडीएफसी बँकेच्या सेलू शाखेला दत्तक गावे म्हणून जोडण्यात आली आहेत. मात्र, या गावांतील एकाही शेतकर्‍यास एचडीएफसी बँकेने पीक कर्ज वा कृषी कर्ज वाटप केलेले नाही. पीक कर्जाची मागणी करणार्‍या शेतकर्‍यांना 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरच कर्ज देण्यात येईल. पीक कर्ज मंजुरीसाठी परभणी येथे 75 किलोमीटर अंतरावर यावेच लागेल. आरबीआय नियमाव्यतिरिक्त अनेक अनावश्यक कागदपत्रे बँकेकडून मागण्यात येत आहेत.

ही सर्व गावे ढालेगाव कोल्हापुरी बंधार्‍याच्या लाभक्षेत्रातील बागायती गावे आहेत. अनेक वर्षे बँकांनी दुर्लक्ष करून कोणतेही वित्तसाह्य दिले नाही. शेतकर्‍यांनी स्वबळावर पाइप लाइन करून आपल्या जमिनी बागायती केल्या आहेत. परंतु वित्तपुरवठय़ाअभावी शेतकरी अडचणीत आहेत. एचडीएफसी बँक जाणीवपूर्वक या शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करीत नसल्याचा आरोप कामगार नेते राजन क्षीरसागर यांनी केला. या भागातील शेतकर्‍यांसह भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या शाखेला कुलूप ठोकले. दत्तक गावांतील शेतकर्‍यांना कर्ज द्या यासह अन्य मागण्या त्यांनी केल्या.