लातूर - डोक्यावरचं कर्ज फिटलं अन् हाती चार पैसे येतील म्हणून सोयाबीन अन् तुरीचा पेरा केला; पण पावसानं पाठ फिरवली. जिवापाड जपलेल्या पिकांनी नजरेदेखत माना टाकल्या. तुरीचा खराटा झाला. गुराच्या दावणी रिकाम्या आहेत. जित्राबाला कुठला चारा आणायचा अन् आम्ही काय खायचं? लई वंगाळ साल लागलंय. सायेब, तुमीच आमाला न्याय द्या, अशा शब्दांत लातूर तालुक्यातील बोरगाव (काळे) येथील शेतकरी राजाभाऊ पोतदार यांनी
आपल्या जिवाची घालमेल सोमवारी केंद्रीय कृषी आयुक्त प्रवेशकुमार यांच्यासमोर मांडली.
पावसाच्या एक-दोन शिडकाव्यावर हरभरा येईल, म्हणून पेरा केला. परंतु सारंच उलट झालं, आता साल कसं कडेला निघेल अन् देणं कसं फिटेल? हीच चिंता सतावत असल्याचे राजाभाऊंनी सांगितलं. चाँद सय्यद यांच्या शेतातील पाण्याअभावी सुकलेल्या उसाची धाटे पथकांनी पाहिली. त्यासाठी केलेली मेहनत अन् खर्चाचा लेखाजोखा भाईंनी पथकासमोर ठेवला. हाती वजाबाकीशिवाय काहीच उरलं नाही, असे ते हताशपणे म्हणाले. प्रवेशकुमार यांनी गतवर्षी व या वर्षातील सोयाबीनचा उतारा व अन्य पिकांबाबत शेतक-यांना प्रश्न विचारले. गावातील विहीर व बोअरही त्यांनी पाहिले.
धीर धरा, हिंमत बांधा, आत्महत्या करू नका, सरकार दरबारी आम्ही तुमचं वास्तव मांडू, असा भावनिक सल्ला अन् धीर देऊन पथक लातूर मुक्कामी गेले. मंगळवारी ते रेणापूर तालुक्यातील पळशी गावाचा शिवार पाहणार असल्याचे कृषिविकास अधिकारी मोहन भिसे यांनी सांगितले.
प्रकाश झोतात पाहणी : केंद्राचे हे पथक लातूर तालुक्यातील बोरगाव (काळे) शिवारात पोहोचता पोहोचता अंधार पडला. पथक सोमवारी रात्री सव्वासात वाजता बोरगाव (काळे) शिवारात पोहोचले. रात्र झाल्याने पथकाने प्रकाशझोत लावून पिकांची पाहणी केली. पथकाने बबन अडसुळे, राजाभाऊ पोतदार यांची तूर अन् हरभरा पाहिला.