नांदेड - यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत सर्वात गंभीर समस्या जनावरांची झाली. जनावरांना खायला चारा नाही, पिण्याला पाणी नाही.
आपल्या दारात जनावरांचे उपाशीपोटी मरण पाहण्यापेक्षा जनावरे विकण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. मंगळवारी भरणा-या लोहा येथील बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीला आल्यामुळे हे वास्तव समोर आले.
लोहा येथील जनावरांचा बाजार हा मराठवाड्यात हळीनंतर प्रसिद्ध आहे. दर मंगळवारी हा बाजार भरतो. या वेळी बाजारात गायी, म्हशी, शेळ्या, बैल मोठ्या संख्येने विक्रीला आले. या वर्षी पाऊस कमी झाल्याने खरीप पिके आली नाहीत. रब्बीची तर पेरणीही झाली नाही. दुष्काळी परिस्थिती असल्याने जिल्हाधिका-यांनी सर्व जलाशयांतील पाणीसाठे
राखीव केल्याने शेतीला पाणी मिळणार नाही. जनावरांचा चारा येणार कोठून, हा शेतक-यांसमोर प्रश्न आहे.
कडबा दीड हजार रुपये शेकडा
जनावरांना यंदा हिरवा चारा नाही. सर्व मदार कडब्यावरच आहे; परंतु रब्बी ज्वारीची पेरणीच झाली नसल्याने कडब्याचे भावही गगनाला भिडले आहेत. आताच कडब्याचा भाव १२००-१५०० रुपये शेकडा झाला आहे. एवढा पैसा खर्च करून जनावरांना काय खाऊ घालावे व आपण काय खावे, असा प्रश्न शेतक-यांना पडला आहे.
चारा डेपोसाठी प्रयत्न
लोहा-कंधार तालुक्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. शेतकरी कवडीमोल भावाने जनावरांची विक्री करीत आहे. चारा, पाणी ही समस्या गंभीर झाल्याने शेतक-यावर ही वेळ आली. पशुपालकांना दिलासा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेऊन लोहा-कंधार तालुक्यात चारा डेपो सुरू करण्याची मागणी करणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले.
दुधाळ जनावरे खाटकाच्या दारात
साधारणत: दुभत्या गायी-म्हशी या शेतकरी वर्गच विकत घेतो. या वर्षी चा-याचा प्रश्न असल्याने दुभत्या म्हशीही खाटकांना विक्री होत असल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळाले. दुधाचा भाव ५०-६० रुपये प्रतिलिटर आहे. दुभती जनावरे विकताना काळीज पिळवटून जात आहे; परंतु नाइलाज आहे. जनावरे ठेवली तर त्यांना खाऊ काय घालावे, हा आमच्यासमोर प्रश्न आहे. त्यामुळे नाइलाजाने म्हशीची विक्री करावी लागत असल्याचे बाबू भोसीकर या शेतक-याने सांगितले.
वळू अर्ध्या किमतीत
लाल कंधारी वळू ही जनावरातील सर्वश्रेष्ठ जात मानली जाते. एका वळूची किंमत जवळपास दीड-दोन लाख रुपये येते; परंतु या वर्षीच्या दुष्काळाने या वळूंची किंमतही अर्ध्यावर आली आहे. गोळेगावचे सोपान प्रल्हाद केंद्रे या शेतक-याचा अडीच वर्षांचा वळू बाजारात केवळ ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत मागत आहेत. कवडीमोल भावाने वळू विकण्यास केंद्रे यांचे मन धजावत नसल्याने त्यांनी वळूची विक्री न करताच घरी परतण्याचा निर्णय घेतला. लाल कंधारी गाईची किंमत अवघी ४०-५० हजारावर आली आहे.