आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकर्‍याचा मृतदेह 24 तास झाडालाच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड, माजलगाव - भाऊबंदकीच्या वादात शेतकर्‍याने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या जदीद जवळा (ता. माजलगाव) येथील प्रकरणी पोलिसांनी निष्काळजीपणा दाखवल्याने मृतदेह शनिवारी सायंकाळपर्यंत झाडालाच लटकून राहिला. पोलिसांकडून प्रकरण दडपल्याचे समोर येताच पोलिस निरीक्षक ओ. डी. माने यांची तातडीने मुख्यालयात बदली झाली आणि गुन्हे दाखल झाले.
जदीद जवळा शिवारात गटनंबर 62 मध्ये शेतात पत्र्याचे शेड करून बाबासाहेब भानुदास बापमारे राहत होते. त्यांना ईश्वर बापूराव बापमारे, (रा. मैदा) राहत होते. रघुनाथ राजाराम बोचरे, बलभीम शिवनाथ बोचरे, वैजनाथ महादू बोचरे, एकनाथ भानुदास बोचरे, शरद वैजनाथ बोचरे, गोकुळ वैजनाथ, दत्ता एकनाथ बापमारे, उद्धव शिवनाथ बोचरे, मिनीनाथ रघुनाथ बोचरे, गोपीनाथ राजाराम बोचरे यांनी जमिनीच्या कारणावरून त्रास देण्यास सुरुवात केली. राहत्या घराचे शेड तोडून नासाडी केली.माजलगाव ग्रामीण ठाण्यात तक्रार देण्यास गेले असता पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला.

शुक्रवारी रात्री वरील आरोपींनी पुन्हा शेतातील शेडमध्ये येऊन धमकावले. पोलिस ठाण्यात अर्ज दिल्याने घरात घसून संसारोपयोगी वस्तूंची नासाडी केली. मारहाण करून घरातील साहित्य बाहेर फेकून दिले. या प्रकाराचा मनस्ताप झाल्याने बाबासाहेब बापमारे यांनी शेतातील चिंचेच्या झाडाला रात्रीच गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी या संदर्भात तोडफोड केल्याची तक्रार देण्यास गेलेल्या पत्नी मीराबाई बापमारे (पत्नी) व मुलगा बाबासाहेब माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गेले असता दाबदडप करून पोलिस निरीक्षक ओ.डी. माने यांनी त्यांना कोठडीत डांबण्याचे सांगत शिवीगाळ केली. यानंतर न्यायासाठी आई व मुलगा थेट बीडला आले. जिल्हा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन कैफियत मांडली. आरोपींवर गुन्हे दाखल होत नाहीत, पोलिस निरीक्षकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत झाडाला लटकलेला मृतदेह खाली घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत अधीक्षक रेड्डी यांनी पोलिस निरीक्षक ओ.डी. माने यांनी कामात निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवून त्यांची चौकशी होईपर्यंत तडकाफडकी पोलिस नियंत्रण कक्षात हजर होण्याचे आदेश दिले. रेड्डी यांच्या आदेशानुसार माजलगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हे नोंदविले आणि शनिवारी रात्री शवविच्छेदन केले.
फोटो - बीडमध्ये एसपींची भेट घेतल्यानंतर मीराबाई बापमारे व मुलगा बाबासाहेब बापमारे .