आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करपलेले सोयाबीन पाहून रडले, शेवटी शेतकऱ्याची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- चिखली येथे या वर्षीच्या नापिकीचा पहिला बळी गेला. डोळ्यासमोर करपणारे सोयाबीन पाहवले गेले नसल्यामुळे शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार रविवारी (दि. ६) दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडला. 
     
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे जिल्ह्यातील पिकांनी पूर्वीच माना टाकल्या आहेत.  चिखली  येथील नामदेव पांडा जावळे (६०) यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली हाेती.  सोयाबीन पावसाअभावी करपून गेले. पेरणीसाठी मोठा खर्च केला असताना पदरात काहीच पडणार नसल्याचा अंदाज जावळे यांना आला.   त्यांच्या जवळच्या नातलगांनी सांगितले की, सुकणाऱ्या साेयाबीनकडे पाहून ते सातत्याने रडत हाेते.  रविवारी सकाळी दोर घेऊन ते शेतात गेले. मात्र, अन्य कुटुंबीय शेतात असल्यामुळे ते परत घरी आले. दुपारी दोन वाजेच्या सुमारास घरात कोणीच नसताना आडूला दोर बांधून त्यांनी गळफास घेतला. त्यांची पत्नी घरी आली असता त्यांना हा प्रकार समजला. त्यांच्या पश्चात पत्नी व चार विवाहित मुली आहेत.  याप्रकरणी बेंबळी (ता. उस्मानाबाद) पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.   
 
दरम्यान, परंडा तालुक्यातील कंडारी येथील शेतकरी महादेव सोपान बिचकुले (४५) यांनी मंगळवारी (दि.८) ३.३० च्या सुमारास कंडारी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून मुलीच्या लग्नासाठी नातेवाइकाकडून घेतलेले पैसे द्यायचे आहेत. परंतु पावसाअभावी पीक वाया गेल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे.
बातम्या आणखी आहेत...