आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांच्या गाड्यांचा धुरळा बसत नाही तोच सावकाराने पाजले शेतकऱ्याला विष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- दुष्काळी बीड जिल्ह्याचा दौरा करण्यासाठी आलेल्या दहा मंत्र्यांच्या गाड्यांचा उडालेला धुरळा खाली बसत नाही तोच बीड तालुक्यातील आडगाव येथे कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या केली. तसेच व्याजाचे पैसे परत करूनही शेतकऱ्याने जमीन परतीसाठी तगादा लावल्याने सावकारानेच शेतकऱ्याला विष पाजल्याची धक्कादायक घटना देवीबाभूळगावात शुक्रवारी रात्री घडली.
देवी बाभूळगावातील रामदास जोगदंड यांनी १९९७ मध्ये भारत शिंदे या सावकाराकडून बहिणीच्या लग्नासाठी एक लाखाचे कर्ज घेतले होते. शिंदे यांनी कर्जापोटी जोगदंड यांची चार एकर जमीन लिहून घेतली होती. पैसे परत दिल्यानंतर जमीन परत देण्याचा करारही झाला. जोगदंड यांनी कर्जाचे एक लाख २००४ मध्ये तर व्याज एक लाख असे दोन लाख सावकाराला देऊन व्यवहार मिटवला होता. परंतु पैसे देऊनही शिंदे व त्याचे इतर साथीदारांनी जमीन परत देण्यास नकार दिला. जमिनीसाठी जोगदंड हे २००४ पासून या सावकारांशी लढा देत आहेत.
डोलारा पेलताना
जोगदंड कुटुंबातील कर्ते असून आई वडील, तीन मुले, पत्नी असा त्यांचा परिवार आहे. त्यांची चार एकर कोरडवाहू जमीन सावकारांनी हडप केली. कुटुंबाचा डोलारा पेलताना हाेणाऱ्या पिळवणुकीविरोधात ते लढा देत आहेत.
प्रकृती स्थिर
रामदास जोगदंड यांना कुटुंबीयांनी शुक्रवारी रात्री उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या पुरुष वैद्यकीय कक्षात त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
आडगावमध्ये विष घेऊन आत्महत्या
बँकेेचे कर्ज फेडण्याच्या चिंतेत तालुक्यातील आडगाव येथील तरुण शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. बाळाप्रसाद रावसाहेब मिठे (३०) असे अात्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव अाहे. विष घेतल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान बाळाप्रसाद यांचा मृत्यू झाला.
जबाब नोंदवला
जिल्हा रुग्णालयातील पोलिसांनी जोगदंड यांचा जबाब नोंदवला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. नेकनूर पोलिसांनी देवीबाभूळगावमध्येही पाहणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चौकशी करू
^शेतकऱ्याला विष पाजल्याच्या घटनेची पोलिस यंत्रणेकडून सखाेल चौकशी करण्यात येईल. त्यानंर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल.
नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, बीड
गावातील पुलावर असताना प्रकार
शुक्रवारी रात्री आठ वाजता रामदास जोगदंड हे गावातील घराजवळील एका पुलावर बसलेले असताना गावातील भारत शिंदे, कैलास शिंदे, कमलाकर शिंदे व इतर एका जीपमध्ये आले व त्यांनी जोगदंड यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. परंतु जोगदंड यांनी विरोध केल्याने झटापटीतच सावकारांनी त्यांना विष पाजले.