आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषणार्थी शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू, जाफराबाद तहसीलमध्ये तासभर ठेवला मृतदेह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाफराबाद - कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांतर्फे विविध मागण्यांसाठी औरंगाबाद येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे अांदोलन सुरू आहे. या आंदोलनात चार दिवसांपासून सहभागी असलेल्या जाफराबाद येथील शिक्षक गजानन विठोबा खरात (३८) यांची प्रकृती गुरुवारी खालावली. त्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. खरात यांचे नातेवाईक व विनाअनुदानित कृती समितीने खरात यांचा मृतदेह सकाळी एक तास जाफराबाद तहसील कार्यालयात ठेवत संताप व्यक्त केला. दरम्यान, औरंगाबादेतही शिक्षक संघटनांनी आक्रमक होत शुक्रवारी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे यांना तब्बल सात तास घेराव घातला.

जाफराबाद येथील समर्थ माध्यमिक विद्यालयात गजानन विठोबा खरात (३८) हे आठ वर्षांपासून विना अनुदानित तत्त्वावर शिक्षक या पदावर कार्यरत होते. कायम विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनेतर्फे एक जूनपासून औरंगाबाद येथील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात ते सहभागी झाले होते. नऊ जून रोजी रात्री गजानन खरात हे उपोषण सोडून घरी आले होते. परंतु शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. दरम्यान, शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे शिक्षक खरात यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत गजानन खरात यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची आर्थिक मदत दिली जावी, त्यांच्या पत्नीस शासन सेवेत सामावून घ्यावे व त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी पालकांनी, शिक्षक संघटनांनी मागणी केली आहे.
या मागणीसाठी खरात यांचा मृतदेह जाफराबाद तहसील कार्यालयात एक तास ठेवण्यात आला होता. या वेळी मोठा जमाव जमला होता. तहसीलदार देविदास गाडे हे उपस्थित नसल्याने पेशकार शिंदे यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर खरात यांचा मृतदेह नेण्यात आला. जाफराबाद येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून वरखेडा विरो येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कृती समितीचे निवेदन
शिक्षक खरात यांच्या निधनानंतर कायम विनाअनुदानित कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन शासनाला देण्यात आले. यामध्ये मृत शिक्षकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी, शिक्षणमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, सर्व अनुदानपात्र शाळांना अनुदान देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.
बातम्या आणखी आहेत...