नांदेड - धर्माबाद तालुक्यातील नेरळी येथे शुक्रवारी सायंकाळी गोदावरी नदीच्या पात्रातील डोहात बुडून पितापुत्रांचा मृत्यू झाला. ऐन पोळा सणाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने नेरळी येथील पोळा सणावर दु:खाचे सावट पसरले.
परशराम अवधुते (५५) आणि नागोराव अवधुते (३३) हे दोघे पितापुत्र गावात गुरे राखण्याचे काम करतात. शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे ते गावातील शेतकऱ्यांची गुरे चारण्यासाठी घेऊन गेले. दुपारी त्यांनी गुरांना पाणी पाजण्यासाठी गोदावरी नदीवर नेले. त्या वेळी काही म्हशी नदीपात्रातील पाण्यात जाऊन बसल्या. काही वेळातच पाऊस सुरू झाल्याने नागोराव म्हशींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी नदीच्या पात्रात उतरला. त्या वेळी त्याला किती पाणी आहे याचा अंदाज नव्हता. नेमका त्याचा पाय खोल डोहात गेला. पोहता येत नसल्याने तो बुडू लागला. काठावर असलेल्या परशमराम अवधुते याने मुलगा बुडत असल्याचे पाहून नदीत उडी मारली. मुलाला वाचवण्यासाठी तो गेला असता, बुडणाऱ्या मुलाने त्याला मिठी मारली. त्यात दोघेही डोहात बुडाले. पाऊस सुरू असल्याने त्या वेळी नदीच्या काठावर कोणी नव्हते. त्यांच्या मदतीला कोणी येऊ शकले नाही. सायंकाळी ही घटना सर्वत्र समजल्यानंतर गावकऱ्यांनी डोहात उतरून सायंकाळी पाच वाजता नागोरावचा मृतदेह शोधून काढला. परंतु रात्री शोधाशोध केल्यानंतर अखेर पहाटे चार वाजता परशुरामचा मृतदेह हाती लागला. या प्रकरणी धर्माबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.