आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भ्रूणहत्या सत्र सुरूच, बीडमध्ये सापडली स्त्री जातीची दोन अर्भके

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - जिल्ह्यावर स्त्री भ्रूणहत्येचा शनिवारी आणखी एक कलंक लागला. शहरात आणखी दोन मुलींची गर्भातच हत्या झाल्याचे उघडकीस आले. बिंदुसरा नदीच्या पुलालगत प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दोन अर्भके मृतावस्थेत सापडली असून परळीच्या फरार डॉक्टर मुंडे दांपत्याच्या शोधात असलेल्या पोलिस व प्रशासनाला ही सणसणीत चपराक आहे. या प्रकारामुळे राज्य सरकारही हादरले असून, माहिती देणा-यास 5 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
प्रकार कळताच जिल्हा रुग्णालयाच्या पथकासह पोलिस घटनास्थळी पोहोचले. अर्भके जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आली. दरम्यान, शहरातील 30 प्रसूतिगृहांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांनी दिले. त्यासाठी 5 पथके नेमण्यात आली. पथकांच्या तपासात शहरात दिवसभरात 32 बालके जन्मल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, अर्भके नाल्यात कोठून आली याचा तपास करण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानांनी जो माग काढला त्यावरुन डॉ. शिवाजी सानप यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. याशिवाय एका कुमारी मातेच्या गर्भपाताचीही चर्चा शहरात होती. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे.
भगवान हॉस्पिटल सुरूच : मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने डॉ. माधव सानप यांचा परवाना निलंबित केल्यानंतरही भगवान हॉस्पिटल सुरू होते. शनिवारी प्रारंभी
पथकाला हॉस्पिटलमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. पोलिस आल्यावर पथक आत घुसले. सानप प्रॅक्टिस करत असल्याचे स्पष्ट झाल्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी
राठोड यांनी कौन्सिलकडे पुन्हा तक्रार दिली.

संशयाची सुई सानप हॉस्पिटलकडे!
स्त्री जातीची दोन अर्भके सापडल्याच्या प्रकरणात दिवसभराच्या तपासानंतर संशयाची सुई डॉ. शिवाजी सानप यांच्या हॉस्पिटलकडे वळली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. सानप यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी करण्यात आली. यातून त्यांच्या रुग्णालयात सकाळी 7 वाजता एक प्रसूति झाली होती. मात्र, बाळाचे वजन अत्यंत कमी असल्याने त्यांनी त्यास पुढील उपचारासाठी बाल रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. नंतर वाटेतच अर्भक दगावल्याने पालकांनीच ते नदीकाठी फेकून दिले असल्याची माहिती समोर येत आहे.

माहिती देणा-यास 5 लाखांचे बक्षीस
मुंबई । बीडमधील स्त्री भ्रूणहत्येच्या प्रकरणाची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गंभीर दखल घेतली असून, याबाबत माहिती देणा-यास 5 लाख रुपयांचे पारितोषिक देण्याची घोषणा त्यांनी शनिवारी केली. बीड जिल्ह्यातील घटनांबाबत मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव जे. के. बांठिया यांच्याशी चर्चा केली. प्रकरणाच्या तपासाचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
इंदूरमध्ये नाल्यात सापडली12 अर्भके
इंदूर । शहरातील एका नाल्याजवळ प्लास्टिकच्या जारमध्ये ठेवलेली 2 ते 7 महिन्यांची 12 अर्भके सापडल्याने खळबळ उडाली. एखाद्या रुग्णालयाच्या लॅबमधील ही अर्भके असावीत, असा प्राथमिक अंदाज आहे. नाल्याजवळ खेळणा-या मुलांच्या हा प्रकार लक्षात आला. स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. अर्भके सुरक्षित ठेवलेली दिसत असल्याने भूणहत्येचा हा प्रकार नसावा, मात्र बेजबाबदारपणा असू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
डॉक्टरांचा सदसद्विवेकच रोखेल स्त्रीभ्रूण हत्या; डॉक्टरांच्याच चर्चासत्रात सूर
स्त्रीभ्रूण हत्या हा आजारच- डॉ. शिल्पा राजाध्यक्ष
स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी पोलिसांचे हात वरच