आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fertilizer, Seeds Purchasing To Farmer In Paithan

पहिल्या पावसानंतर बी-बियाणे खरेदीची लगबग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- तालुक्यात पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांची मशागतीसाठी लगबग सुरू झाली आहे. पैठण तालुक्यातील 80 टक्के मशागतीची कामे पूर्ण झाली असून शेतकरीबांधव बी-बियाण्यांच्या खरेदीत व्यग्र असल्याचे दिसून येत आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन बी-बियाणे विक्रेत्यांनी यंदा हंगामाच्या चढ्या दराने बियाण्यांची विक्री सुरू केली आहे.

कृषी विभागाच्या वतीने चढ्या दराने बियाण्यांची विक्री करणार्‍या व्यापार्‍यांवर निर्बंध घालण्यासाठी भरारी पथकांची स्थापना करण्यात आली असली, तरी ती केवळ कागदोपत्रीच असल्याचे दिसते. या पथकातील प्रमुख असणार्‍या कृषी अधिकार्‍यांनी सध्या आणखी एक महिना तरी या पथकाची गरज नसल्याचे सांगून आधीच दुष्काळाने होरपळलेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

पैठण तालुक्यात दरवर्षी विविध बी-बियाण्यांसह खतांची विक्री चढ्या भावाने होत असते. गेल्या वर्षी तर खते घेण्यासाठी शेतकर्‍यांना रांगा लावूनही पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद खावा लागला होता. मात्र, एवढे करूनही मागील वर्षी पाऊस कमी पडल्याने शेतकर्‍यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. यंदा पाऊस समाधानकारक राहील, असे दिसत असल्याने शेतकर्‍यांनी दोन महिन्यांपूर्वीच मशागतीस सुरुवात केली. त्यात दोन दिवस सलग पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग बी-बियाणे खरेदीसाठी बाजारात गर्दी करत आहे. मात्र, व्यापार्‍यांकडून बी-बियाण्यांच्या पाकिटावरील किमतीपेक्षा 100 ते 150 रुपये जास्त आकारले जातात. या प्रकाराकडे कृषी विभागाचे लक्ष नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

लागवड क्षेत्र वाढणार
गेल्या वर्षी पावसाने दगा दिल्याने लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट झाली होती. मात्र, यंदा लागवडी खालील क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

शेतकर्‍यांनी तक्रार करावी
>शेतकर्‍यांनी सध्या बियाणे खरेदी करण्याची घाई न करता, जास्त दराने बियाणे विक्री करणार्‍या व्यापार्‍यांची कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी. त्यांच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल.
-भाऊसाहेब पायघन, तालुका कृषी अधिकारी.

>सध्या बियाण्यांची कमी प्रमाणात खरेदी होत असल्याने व्यापारीवर्ग प्रतिबॅगमागे शंभर रुपये जास्त लावत आहे. मात्र, नंतर आणखी भाव वाढतील म्हणून आताच खरेदी करत आहोत.
- बाबासाहेब मगर, शेतकरी

>शेतकर्‍यांची व्यापार्‍यांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी कृषी विभागाच्या पथकांनी लक्ष द्यावे.
-कांतराव औटे, राष्ट्रवादी काँग्रेस