आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेरूळ परिसरातील 41 हेक्टरवरील फळबागांचे पंचनामे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेरूळ- परिसरातील 41 हेक्टरवरील फळबागांचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांच्या वतीने करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकर्‍यांना उशिरा का होईना पण शासनाची मदत मिळणार असल्याने शेतकर्‍यांच्या चेह-यावर समाधान दिसत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक फळबागा पाण्याअभावी सुकून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी शासनाकडे या फळबागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, तसेच ज्या फळबागा सुकण्याच्या मार्गावर आहे. या फळबागांना जगवण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने या फळबागांचे पंचनामे करून अनेक शेतकर्‍यांना बागा वाचवण्यासाठी आर्थिक मदतीचा हात दिला. मात्र, खुलताबाद तालुक्यातील अनेक गावांतील फळबागाचा पंचनामाच करण्यात आला नव्हता. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी बागांचा पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी केली होती. त्यानुसार वेरूळ परिसरातील तलाठी लक्ष्मण जाधव, ग्रामसेवक बी. आर. म्हस्के, कृषी सहायक प्रवीण गायकवाड यांनी 41 हेक्टरवरील मोसंबीच्या बागांचे पंचनामे करून प्रशासनाकडे सादर केले आहेत. त्यामुळे मदत मिळण्याचा मार्ग सुकर झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहेत.

>आम्ही शासनाच्या आदेशानुसार साधारण 41 हेक्टरवरील फळबागांचे पंचनामे केले आहेत. यात 10 ते 12 हेक्टरमधील फळबागा पूर्णपणे सुकून गेलेल्या आहेत. बाकी बागांची स्थिती टक्केवारीनुसार ठरवण्यात आली आहे.
लक्ष्मण जाधव, तलाठी

>सुकलेल्या फळबागांच्या पंचनाम्यांचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठवणार आहे. त्यावर तेच निर्णय घेतील.
अनिता भालेराव, तहसीलदार