आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fifth Victim Of Drought : Youth Farmer Committeed Suicide In Jalna Taluka

दुष्काळाचा पाचवा बळी : जालना तालुक्यात तरुण शेतक-याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - गुढीपाडव्याचा सण. घरोघरी गुढी उभारून सण साजरा करण्यात मग्न असलेले ग्रामस्थ. गावात ऋषीबाबाची यात्रा अन् पंचक्रोशीतील हजारो भक्तांनी दर्शन घेण्यासाठी केलेली गर्दी. यातच मुलगा दुपारी 4 वाजले तरी घरी आला नाही म्हणून आईने यात्रेमध्ये शोधाशोध केली. मात्र, मुलाचा पत्ता लागला नाही. दरम्यान, मुलाने जनावरांना पाणी पाजले की नाही म्हणून बघण्यासाठी आई शेतात गेली. बघते तर काय, लिंबाच्या झाडाला मुलाचा लटकलेला मृतदेह. जालना तालुक्यातील आसरखेडा येथील 22 वर्षीय युवक संजय कचरूबा बोडखे याने दु. 4 वाजेदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही घटना. 27 फेब्रुवारीपासूनची ही पाचवी आत्महत्या आहे.
संजय बोडखे याच्या कुटुंबाकडे आसरखेडा शिवारात गट नं. 194 मध्ये 4 एकर बागायती जमीन आहे. मात्र, या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे 40 फूट खोल असलेल्या विहिरीत थेंबभरसुद्धा पाणी नाही.


शिवाय, चार एकर शेतामध्ये लावलेल्या कपाशीतून फक्त 5 क्विंटल कापूस झाला. यातून बियाणे व खताचा खर्चही वसूल झाला नाही. परिणामी कर्जाचा बोजा वाढत गेला. लोकांचा पैशासाठी तगादा, तर दुसरीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम मिळेना.


शेतामध्ये कुठेच काम मिळत नसल्याने संजय विहीर खोदकाम सुरू असलेल्या ठिकाणी क्रेन चालवण्याच्या कामाला जात असे. मात्र, या वर्षी पाऊसच न पडल्यामुळे विहिरींची कामेही बोटावर मोजण्याइतकीच. त्यामुळे आठवड्यातूनचार-दोन दिवसच काम मिळत असे. सर्वच कुटुंबांतील सदस्यांची अशीच स्थिती असल्यामुळे घर चालवणेसुद्धा मुश्कील होते.


चिठ्ठीत काय आढळले ?
संजय बोडखे याचा मृत्यू झाल्यानंतर खिशामध्ये एक चिठ्ठी आढळून आली. गतवर्षी बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेतले होते. या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे व शेती नापीक झाल्यामुळे शेतात काहीच आले नाही. यामुळे आत्महत्या करत असून यास मी स्वत: जबाबदार असल्याचे संजयने चिठ्ठीत लिहून ठेवले होते.


संजय खेळायचा कुस्ती
मृत संजयला कुस्ती खेळण्याचा लहानपणासूनच छंद होता. त्याने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. तो गाव तसेच परिसरातील गावांमध्ये कुस्ती खेळायला जात असे. पिळदार शरीर, सावळा रंग, कुस्तीमध्ये मल्लांशी खेळताना दोन हात करणारा संजय गावात खूपच प्रिय होता.


वर्षभरापूर्वी झाले होते बहिणीचे लग्न
गतवर्षी बहीण चंद्रकला हिच्या लग्नासाठी खासगी सावकारासह बँकेकडून 2 लाख रुपये घेतले होते. शेतात चांगले पीक आल्यावर भरपूर पैसे मिळतील व थोडे-थोडे करून लोकांकडून घेतलेली सर्व रक्कम परत करू, असा कुटुंबाचा मानस. मात्र, या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे त्यांच्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा झाला व पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा भटकंती करण्याची वेळ आली. यातच दोन बैल, दोन म्हशींना चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर होता.