आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM SPL: तक्रारदार अन‌् नगरसेवकांत हाणामारी, ‘तारीख पे तारीख’ चा सिलसिला सुरूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपला मतदान करणारे माजी मंत्री सुरेश धस यांचे  समर्थक व  पाच नगरसेवकांच्या सुनावणीत शुक्रवारीही पुन्हा ‘तारीख पे तारीख’ चा सिलसिला सुरू राहिला. तर पात्रतेबाबत तक्रार केल्याने बीड नगर परिषदेच्या तीन नगरसेवकांचीही शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात  सुनावणी झाली.त्यांनाही पुढचीच तारीख देण्यात आली आहे. दरम्यान, नगरसेवकांच्या सुनावणीनंतर तक्रारदार व नगरसेवकांचे समर्थक समोरासमोर आले. तक्रारीच्या कारणावरून तक्रारदारालाच  मारहाण करण्यात आली. दोन्ही गटांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.   

बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी मंत्री सुरेश धस समर्थक असलेल्या व राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेल्या पाच नगरेसवकांनी व्हीप डावलून भाजपला मतदान केले होते. तर आणखी एक सदस्य मंगला गणपत डोईफोडे या गैरहजर राहिल्या होत्या. या  विरोधात राष्ट्रवादीचे  जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद  गटनेते बजरंग सोनवणे, अध्यक्षपदाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला प्रकाश सोळंके व अजय मुंडे यांनी या सदस्यांना अपात्र करण्याबाबतची  तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. यापूर्वी झालेल्या सुनावणीत सदस्यांना शुक्रवार १ सप्टेंबर २०१७ रोजीची  तारीख देण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांच्या दालनात या सदस्यांची सुनावणी झाली. सदस्य. प्रकाश कवठेकर, बजरंग सोनवणे, अजय मुंडे व इतर सदस्यांचे वकील  या वेळी उपस्थित होते. बंडखोर सदस्यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले असून न्यायालयाने १९ सप्टेंबर रोजीची तारीख दिलेली आहे. तोपर्यंत मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती केली. जिल्हाधिकारी सिंह यांनी ‘रिटर्न स्टेटमेंट’ दाखल करण्याचे आदेश दिले. 

नगरसेवकांचीही सुनावणी  
बीड नगर परिषदेचे  काकू- नाना विकास आघाडीचे गटनेते फारुक पटेल, खदीरभाई ज्वारीवाले व अन्य एका नगरसेवकांविरोधात अपात्रतेच्या तक्रारीवरही शुक्रवारीच सुनावणी झाली. त्यांच्या बाबतीतही तारीख पे तारीख असाच शिरस्ता कायम राहिला.  इम्तियाज तांबाेळी यांनी सदस्यत्व अपात्रतेप्रकरणी  जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती.   

मारहाण केल्याने गोंधळ  
सुनावणीसाठी पुढची तारीख मिळाल्याने दोन्ही गटाचे नगरसेवक  जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असतानाच इम्तियाज तांबोळी व अशपाक इनामदार हे समोरासमोर आले. प्रकरण हातघाईवर येऊन दोघांत मारहाण झाली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडला.  अदखलपात्र गुन्हा नोंद झाला.

शांतता बैठक अन् मारहाण  
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी  बकरी ईदच्या निमित्ताने शांतता समितीची बैठक सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकही या बैठकीला उपस्थित होते. वरच्या मजल्यावर शांतता समितीची बैठक सुरू असताना खालच्या मजल्यावर  मात्र नगरसेवकांच्या गोंधळाने अशांतता निर्माण झाल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...