आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या बैठकीत दोन गटांत खडाजंगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोहारा - सदस्य नोंदणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या येथील शिवसेनेच्या बैठकीत दोन गटांतील कार्यकर्त्यांनी एकमेकांवर चिखलफेक केली. आरोप - प्रत्यारोपाच्या फैरींमध्ये एकेरी भाषा वाढल्यामुळे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांना हस्तक्षेप करावा लागला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी चव्हाट्यावर आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

येथील भारतमाता मंदिरामध्ये रविवारी (दि. 3) शिवसेनेची सदस्य नोंदणी करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाप्रमुख पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, तालुकाप्रमुख मोहन पनुरे, युवासेना तालुकाप्रमुख दीपक मुळे, माजी तालुकाप्रमुख शेखर पाटील, तालुका उपप्रमुख प्रताप लोभे, जिल्हा उपप्रमुख अमोल पाटील, अविनाश राठोड, शहरप्रमुख सलिम शेख, उपतालुकाप्रमुख अजमेर कारभारी यांची उपस्थिती होती.

सुरुवातील आमदार चौगुले यांचे भाषण झाले. जिल्हाप्रमुख पाटील यांच्या भाषणापूर्वीच माकणी विभागाचे विभागप्रमुख पंडित ढोणे यांनी तालुकाप्रमुख मोहन पनुरे यांच्यावर शरसंधान करण्यास सुरुवात केली. अन्य पक्षांसोबत असणारे संबंध, शिवसैनिकांना विश्वासात न घेणे, शासकीय कार्यालयातून हप्ते गोळा करणे, सर्वसामान्यांच्या कामकाजासाठीही पैसे घेणे अशा आशयाचे गंभीर आरोप ढोणे यांनी केले. प्रत्युत्तर देताना पनुरे यांनी सर्व आरोप धुडकावून लावले. तसेच एकेरी भाषा वापरत प्रत्यारोप केले. यातच माजी तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी व खेडचे उपसरपंच गौतम बेलकुंडे यांनी पनुरे यांना विरोध केला. यामुळे गोंधळ आणखी वाढला. यावेळी जिल्हाप्रमुख पाटील यांनी सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. दोन्ही बाजूंकडील कार्यकर्त्यांना गप्प बसवून असा प्रकार घडू नये, याची दक्षता घेण्याची सूचना केली. यापुढे थेट शिवसैनिकांशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली जाईल. तसेच शिवसैनिकांनीही आपल्याशी थेट संपर्क साधावा, संबंधितांना योग्य न्याय दिला जाईल, असे जिल्हाप्रमुख सुधीर पाटील यांनी सांगितले आहे.

सर सेना विरुद्ध आमदार सेना!
बैठकीतील या प्रकारामुळे खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांची सर सेना तसेच आमदार ज्ञानराज चौगुले यांची आमदार सेना असे दोन गट पडल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे. एक गट आमदारांच्या कामावर खुश तर दुसरा नाराज असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याचा फटका बसण्याची शक्यता आहे. प्रा. गायकवाड व चौगुले यांच्यामध्ये प्रत्यक्षात चांगले संबंध आहेत. कार्यकर्त्यांमध्ये असलेली दरी संपवण्यासाठी दोघांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
- सर्व शिवसेना पदाधिका-यांना विश्वासात घेऊन समजावून सांगण्यात आले आहे. एकमेकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यात आले आहेत. यापुढे सर्वांनी एकमेकांना सोबत घेऊन काम करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. यापुढे असा प्रकार होणार नसल्याचे शिवसैनिकांनी सांगितले आहे.’’
सुधीर पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना.