आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: फायर ब्रिगेड, कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान; तब्बल 32 हजार क्विंटल बियाणे वाचवले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- औद्योगिक वसाहतीतील महाबीजच्या बियाणे प्रक्रिया केंद्राला आग लागून मोठे नुकसान झाले. मात्र आग लागल्याबरोबर महाबीजच्या कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटिंग्युशर, वॉटर हायड्रंट यांचा वापर करून आग नियंत्रणात ठेवली, तर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत योग्य रस्त्याची निवड करीत ११ व्या मिनिटात घटनास्थळ गाठले. त्यामुळे जवळपास ३० हजार क्विंटल बियाणे आगीच्या भक्षस्थानी पडण्यापासून वाचविण्यात यश आले. 

औद्योगिक वसाहतीतील एमआयडीसीच्या कार्यालयासमोरच अडीच एकर क्षेत्रात महाबीजचे बियाणे प्रक्रिया केंद्र जिल्हा कार्यालय आहे. या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात तूर, गहू, सोयाबीन आदी पिकांचे बियाणे साठवले आहे. काही बियाण्यांवर प्रक्रिया केली आहे, उर्वरित बियाण्यांची प्रक्रिया करण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी ६.१० वाजता बियाणे प्रक्रिया केंद्रात आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. एका कर्मचाऱ्याने याची माहिती दूरध्वनीवरून विभागीय व्यवस्थापक जगदीश खोकड यांना दिली, तर काही कर्मचाऱ्यांनी फायर एक्सटिंग्युशर वॉटर हायड्रंटचा वापर करून आग नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. 

अग्निशमन विभागाला माहिती दिल्याने ११ मिनिटांत अग्निशमन बंब येथे दाखल झाला. दीड तासाच्या प्रयत्नांनंतर रात्री वाजेच्या सुमारास संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात यश आले असे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक जगदीश खोकड यांनी या वेळी सांगितले. 

कर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान 
महाबीजच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या जागेवर एक्सटिंग्युशरचा मारा केला. एचडीपीई प्लास्टिक बॅग आणि कापडी पिशव्यांनी मोठा पेट घेतल्याने आगीच्या ज्वाला वाढत चालल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी वॉटर हायड्रंटची मदत घेत आग नियंत्रणात ठेवली. फायर ब्रिगेडचा बंब दाखल झाल्यानंतर आग अटोक्यात आणली. अवघ्या काही मिनिटांत संपूर्ण गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले असते. 

असा आहे घटनाक्रम 
६.१० प्रक्रीया केंद्रात लागली आग 
६.१४ व्यवस्थापकांना केला फोन 
६.२८ अग्निशमन विभागाला दिली मािहती 
६.३९ अग्निशमन बंब दाखल 
८.०५ आग अटोक्यात आणण्यात यश 

चक्क मोबाइल टॉर्चची मदत घेतल्याने फायदा 
स्टोअररूममध्ये आग लागल्यानंतर या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. अग्निशमन बंब पोहोचताच या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मोबाइलवरील टॉर्च सुरू करून दीड तासात ही आग विझविली. या आगीमुळे आतील भागात मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. फायर ब्रिगेडचे विश्वनाथ बनसोडे, रवी बनसोडे, विठ्ठल कांबळे, अब्दुल बासित, कमलसिंग राजपूत आदींनी प्रयत्न करूनही आग आटोक्यात आणली. 

शनिवारी कळणार नुकसानीची माहिती
अागीनंतर येथे अंधार झाला होता त्यामुळे शनिवारी या संपूर्ण पोत्यांची तपासणी केली जाणार आहे. यात खराब दिसत असलेले बियाणे पोती वेगळी काढली जाणार आहेत. शिवाय आगीच्या ज्वालांनी शेडचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचीही माहिती घेतली जाणार आहे. त्यामुळे या नुकसानीचा आकडा वाढू शकतो, असे सूत्रांनी सांगितले. 

बियाण्यांची चाचणी घेणार 
या घटनेत बियाण्यांच्या काही बॅगा जळाल्या असल्या तरी त्यांची संख्या फारच कमी आहे. मात्र हे बियाणे आता थेट शेतकऱ्यांना विक्री करता त्याची उगवणक्षमता तपासली जाणार आहे. कारण आगीच्या झळांमुळे बियाणे खराब होऊ शकते. शिवाय आग विझविताना पाण्याचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात िबयाण्यांच्या बॅग ओल्या झाल्या आहेत. जिल्ह्यात या बियाण्यांचे उत्पादन होते. 

तत्काळ बंब दाखल 
माहिती फायर ब्रिगेडला मिळाली. लगेचच अग्निशमन बंब घटनास्थळाकडे रवाना झाला. सध्या सिमेंट रस्त्यांची कामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी रस्ते खोदलेले आहेत. गर्दीची वेळ असल्याने अनेक वेळा वाहतूक खोळंबते याचा विचार करीत या कर्मचाऱ्यांनी नेहमीच्या मार्गाचा वापर करता शीतलामाता मंदिर, गोल्डन ज्युबिली शाळा या मार्गाचा वापर केला. अवघ्या ११ मिनिटांत अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. 

बारा लाखांचे नुकसान 
प्राथमिक पाहणीत १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसते. यात प्रोसेसिंग मटेरियल, पॅकिंग मटेरियल जळाले आहे. सोयाबीन तुरीचे काही बियाणे जळाले आहे. संपूर्ण नुकसानीची माहिती घेतो आहोत. सर्व गोदामाची पाहणी केल्यानंतरच नेमके किती नुकसान झाले हे सांगता येईल. 
बातम्या आणखी आहेत...