आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये गोळीबार, गोळी स्पर्शून गेली; संदीप क्षीरसागर समर्थक सर्फराज जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- काकू - नाना विकास आघाडीचे कार्यकर्ते, संदीप क्षीरसागर समर्थक सर्फराज उर्फ शप्पू शेख यांच्यावर रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास गोळीबार करण्यात आला. यानंतर शहरात खळबळ उडाली असून जिल्हा रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली. गोळीबार कुणी आणि का केला हे उशीरापर्यंत स्पष्ट झाले नाही.

सर्फराज शेख हे काकू नाना विकास आघाडीचे कार्यकर्ते व क्रिकेटपटू आहेत. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास क्रिकेट  खेळून मित्र मेहराजसह घराकडे परतत असताना डॉ. आंबेडकर पुतळा ते चांदणी चौक दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या दिशेने पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी सर्फराज यांच्या पोटाला चाटून गेली. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच 
उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह आघाडीच्या दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गर्दी केली होती. दरम्यान, सर्फराज यांच्यावर गोळीबार का करण्यात आला, कुणी हे केला हे रात्री उशिरापर्यंत समोर आले नव्हते. सर्फराजसोबत असलेला मेहराज याचा उशिरापर्यंत जबाब नोंदवण्यात येत होता. अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपाधीक्षक सुधीर खिरडकर, शहर ठाण्याचे पीआय सुलेमान सय्यद हे जिल्हा रुग्णालयात तळ ठोकून होते. 
 
क्रिकेटवरून वाद 
दरम्यान, शहरात येत्या काही दिवसांत मोठ्या क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. त्यासाठी सर्फराज यांचा संघ स्पर्धेत होता. यातून काही वाद असण्याची प्राथमिक शक्यता अाहे. परंतु, सहा महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ते प्रभाग १७ मध्ये आघाडीचे उमेदवार होते. अवघ्या तीन मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे यात राजकीय वाद असण्याचीही शक्यता असून सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...