आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डाची पहिलीच सभा स्थगित; सदस्यांत नाराजी, वाद चिघळणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - श्री सचखंड हुजूरसाहिब गुरुद्वारा बोर्डाची गुरुवारी होणारी पहिलीच सभा अध्यक्ष तारासिंघ यांनी कोरमअभावी स्थगित केल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सभेनंतर बोर्डाचे सदस्य शेरसिंघ फौजी व गुरुमितसिंघ महाजन यांनी अध्यक्ष तारासिंघ यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केल्याने हा वाद चांगलाच चिघळण्याची शक्यता आहे.
फोटो - नांदेड येथील श्री सचखंड हुजुरसाहिब गुरुद्वारा बोर्डाची पहिली मीटिंग गुरुवारी अध्यक्ष तारासिंघ यांनी कोरमअभावी स्थगित केली. त्यामुळे बोर्डाच्या सदस्यांनी त्यांचा निषेध करीत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. छाया- नरेंद्र गडप्पा

तब्बल १५ वर्षांनंतर गुरुद्वारा बोर्डाचे गठन करण्यात आले. अधिनियमात बदल करून शासनाने बोर्डाच्या अध्यक्षपदी भांडुपचे आमदार तारासिंघ यांची नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीपासूनच इतर सदस्यांत नाराजी होती. त्या नाराजीत आजच्या सभेने अधिक भर घातली. नवगठित गुरुद्वारा बोर्डाची पहिली सभा शासनाने नोटीस (दि. १० रोजी) काढून गुरुवारी ११ वाजता सभा बोलावली. सभेसाठी अध्यक्ष तारासिंघ मुंबईवरून येथे दाखल झाले. परंतु सभेला केवळ अध्यक्ष तारासिंघ, सदस्य शेरसिंघ फौजी, गुरुमितसिंघ महाजन, सरजितसिंघ गिल हे चाैघेच हजर होते. कोरम नसल्याचे कारण सांगत अध्यक्षांनी सभा स्थगित केली.

सभेला कोरमची अट नाही
शेरसिंघ फौजी व गुरुमितसिंघ महाजन यांनी सभेनंतर पत्रकार परिषद घेऊन बोर्डाच्या पहिल्या सभेला कोरमची अट नसल्याचा दावा केला. या सभेत नियमाप्रमाणे पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यामुळे या सभेला कोरमची अट नाही. बोर्ड एकूण १७ सदस्यांचे आहे, परंतु सद्य:स्थितीत बोर्डात केवळ १३ सदस्य असल्यानेही कोरम पूर्ण होतो. पण अध्यक्षांनी सभा होऊच द्यायची नाही असा चंग बांधला. या सभेला कोणीही येऊ नये यासाठी स्वत: अध्यक्षांनीच सदस्यांना फोन केले. दोन सदस्य तर त्यांच्यासोबतच शहरात दाखल झाले, परंतु ते दोघेही सभेला मात्र आले नाहीत. यावरून ही सभा होऊ नये, असे अध्यक्षांनीच ठरवले हे सिद्ध होते, असाही आरोप फौजी-महाजन यांनी केला.

कोरम नसल्यानेच सभा तहकूब
सभेला केवळ ३ सदस्य हजर होते. इतर सदस्य येण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे सभा रद्द केली. शासनाने या सभेची नोटीस अत्यंत कमी वेळात काढली. केवळ चार-पाच दिवसांच्या नोटीसवर पंजाबातून येणाऱ्या सदस्यांना सभेला येणे शक्य नाही. सभेला येऊ नका, असा फोन मी कोणाही सदस्याला केलेला नाही असा दावा तारासिंघ यांनी केला.

तारासिंघ यांना हटवा
तारासिंघ येथे सेवेच्या भावनेने आलेले नाहीत. ते राजकारण करीत आहेत. त्यांची नियुक्ती लोकशाही पद्धतीने झालेली नाही. मंत्रिपद देता येत नसल्याने त्यांना भाजप नेत्यांनी बोर्डाचे अध्यक्षपद दिले. त्यांना त्या पदावरून तातडीने हटवावे, अशी मागणी शेरसिंघ फौजी व गुरुमितसिंघ महाजन यांनी केली.