आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Time Parli Get Red Siren Light Car, Dhananjay Munde Become Opposition Leader

परळीला पहिल्यांदाच दोन लाल दिवे, धनंजय मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी निवड निश्चित झाल्याने परळीतील कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. चौकाचौकांत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. परळीच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्या आहेत.

राज्यात सत्ताबदल झाल्याने विधानसभा व विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी सोमवारी संबंधित सभागृहात अर्ज दाखल करायचा होता. विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ जास्त असल्याने त्यांचाच विरोधी पक्षनेता राहणार हे निश्चित होते. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार धनंजय मुंडे यांचे नाव निश्चित केले. पीठासन अधिका-यांकडे एकमेव धनंजय मुंडे यांचाच अर्ज आला. त्यामुळे त्यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड निश्चित झाली आहे. अधिकृत घोषणा मंगळवारी होणार आहे. ही बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी शहरात जल्लोष साजरा केला. शहरातील विविध चौकांमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राजेंद्र सोनी, दिलीप कराड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार धनंजय मुंडे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यामुळे त्यांनाही लाल दिव्याची गाडी असणार आहे. ग्रामविकास, जलसंधारण, महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यानंतर धनंजय मुंडे यांनाही लाल दिव्याची गाडी मिळाली आहे. त्यामुळे परळीच्या विकासाला चालना मिळणार आहे.