बीड - परळी येथील नेमीचंद दीपचंद बडेरा शिशुगृहातील अकरापैकी पाच बालकांना महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तांची परवानगी न घेता परस्पर दत्तक दिले आहे. पुण्याच्या राज्य दत्तक स्रोत संस्थेने केलेल्या तक्रारीनुसार झालेल्या तपासणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी बीडच्या बालकल्याण समितीने शिशुगृहाची तपासणी करून नोटीस बजावत दोन दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. देणगी, पैशाच्या हव्यासापोटी सरकारी परवानग्यांना बगल देत हा प्रकार झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जालना येथील महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशनकडून राज्यातील जालना, जळगाव व परळी येथे शिशुगृहे चालवली जातात. परळी येथे स्व. नेमीचंद दीपचंद बडेरा या नावाने १७ ऑगस्ट २००९ पासून हे शिशुगृह सुरू आहे. या शिशुगृहात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना प्रवेश दिला जातो. बालक ठेवणा-या माता-पित्यांची नावे गोपनीय ठेवली जातात; परंतु बालके दत्तक घेणा-यांमध्ये उच्चभ्रू लोक असतात. मागील पाच वर्षांत या शिशुगृहात ७३ बालके दाखल झाली आहेत. सहा वर्षे वय पूर्ण झालेल्या सात बालकांना पालकांच्या ताब्यात दिलेले आहे. एका बालकास एच.आय.व्ही.ची बाधा व तीन बालकांचे वय सहा वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचेही स्थलांतर झाले आहे.
मागील पाच वर्षांत सहा मुले दगावली आहेत. या शिशुगृहाच्या मुले दत्तक देण्याच्या परवान्याची मुदत ३१ ऑगस्ट २०१३ रोजी संपली होती. शिशुगृहाने परवान्याचे नूतनीकरण केलेले नव्हते. नूतनीकरण केले नसताना शिशुगृहात अकरा बालकांपैकी पाच बालके पुण्याच्या महिला व बालकल्याण आयुक्तांची कोणतीच परवानगी न घेता दत्तक देण्यात आली आहेत. या पाच बालकांत दोन मुली, तीन मुलांचा समावेश आहे. या प्रकरणी पुण्याच्या राज्य दत्तक स्रोत संस्थेकडे तक्रार गेल्यानंतर या संस्थेने बीडचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, क्षेत्रीय कार्यकर्ता गजाजन जानवळे यांना तपासणी करण्यासाठी कळवले. यावरून दोन्ही अधिका-यांनी १६ जानेवारी २०१५ रोजी परळीतील शिशुगृहाची दिवसभर तपासणी केली. या तपासणीत हजेरीपटावर प्रवेशित अकरा बालकांची नावे दिसली; परंतु पाच बालके दिसून आली नाहीत. कागदपत्रांची पडताळणी केली तेव्हा शिशुगृहाने परवान्याचे नूतनीकरण केलेच नसल्याचे समोर आले.
खर्चावरून झाला होता वाद : दीड वर्षापूर्वी हे शिशुगृह परळी येथील धरमचंद बडेरा चालवत होते. तोपर्यंत ते सुरळीत सुरू होते. परंतु चॅरिटेबल संस्थेचे पदाधिकारी व बडेरा यांच्यात खर्चावरून वाद झाला. त्यानंतर बडेरा यांनी शिशुगृह चालवणे बंद केले. तेव्हापासून हे शिशुगृह परळी येथीलच शांतीलाल गणेशलाल राका यांच्या घरात चालवण्यात येत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, कुठे दिली बालके दत्तक?