आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपिटीचा तडाखा: पाच शेतकर्‍यांच्या आत्महत्या; पिकांची नासाडी, डोक्यावर कर्जाचा डोंगर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/नांदेड/लातूर/उस्मानाबाद- हातातोंडाशी आलेले रब्बी पीक अवकाळी पाऊस, गारपिटीत उद्ध्वस्त झाल्यामुळे मराठवाड्यातील पाच शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा यात समावेश आहे. दरम्यान, कळंब तालुक्यातील जाळून घेतलेल्या शेतकर्‍याची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

आधी दुष्काळाने आणि आता गारपिटीने थैमान घातलेल्या मराठवाड्यातील शेतकर्‍यांना उभारीसाठी भरीव आर्थिक मदतीची गरज आहे. मात्र, सरकारी काम आणि सहा महिने थांब, याचाच प्रत्यय येत असल्याने मराठवाड्यातील वैफल्यग्रस्त शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत.

अशोक शिवाजी शेळके (रा. पठाण मांडवा, ता. अंबाजोगाई, जि. बीड), संतुका रामाजी गारोळे (42, रा. गोलेगाव, ता. कंधार, जि. नांदेड), भागवत त्र्यंबक माने (40, रा. शेंद, जि. लातूर), दादा भागाजी दौड (48, रा. पानवडोद बु., ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद), बालाजी सुब्राव बागल (32, शिंगोली, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) अशी आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची नावे आहेत, तर शुक्रवारी पेटवून घेतलेल्या राजेंद्र हरिश्चंद्र लोमटे (36, रा. देवळाली, ता. कळंब, जि. उस्मानाबाद ) या शेतकर्‍याची प्रकृती आता स्थिर आहे.

मराठवाडा हवालदिल; तातडीच्या मदतीची अपेक्षा

सोसायटीचे पंचवीस हजारांचे कर्ज
अंबाजोगाई तालुक्यातील अशोक शिवाजी शेळके यांना वडिलोपार्जित पाच एकर जमीन आहे. त्यातील दोन एकर वहितीखाली आहे. या उत्पन्नावर घरखर्च भागत नसल्यामुळे अशोक आणि आई संजीवनी शेळके रेणा कारखान्यावर ऊसतोडणीसाठी गेले होते. अशोक शेळके यांना तीन अपत्ये आहेत. गावात दोन भावंडे आणि एक बहीण. मोठा भाऊ खंडू शेळके हा शेतमजुरीचे काम करायचा. बहीण सारिका दहावीत शिक्षण घेत आहे. महादेव हा दोन एकर शेती पाहत होता. जिल्हा बँकेच्या सेवा सहकारी सोसायटीकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेऊन महादेव नव्या दमाने शेती करू लागला. एक एकरावर हरभरा व एक एकरात गव्हाचे पीक घेतले होते. मात्र, 3 मार्चपासून झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दोन्ही पिके उद्ध्वस्त झाली. शुक्रवार सायंकाळी त्यांनी घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

99 हजार कर्जाची धास्ती
कंधार तालुक्यातील संतुका गारोळे यांची 2 एकर शेती आहे. खरीप हंगामासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामधून कर्ज काढले. कर्जाची रक्कम व्याजासह 99 हजार रुपये झाली. रब्बी हंगामात हे कर्ज फिटेल अशी आशा होती, परंतु गारपिटीने व वादळी पावसाने पिकांची हानी झाली. सततच्या नापिकीने व कर्जाचा वाढता डोंगर यामुळे ते सतत चिंतेत असत. वैफल्यग्रस्त अवस्थेतच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती गोलेगावचे पोलिस पाटील अशोक तुकाराम गारोळे यांनी कंधार पोलिस ठाण्यात दिली.

कर्ज, वर गारपीट...
लातूर जिल्ह्यातील भागवत त्र्यंबक माने यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना अडीच एकर शेती होती. गेल्या वर्षी त्यांनी खासगी कर्ज काढून मुलीचा विवाह केला होता. एका राष्ट्रीयीकृत बँकेकडून 70 हजारांचे कर्जही त्यांनी उचलले होते.

पैसा आणायचा कुठून...
खरिपात आलेला शेतीमाल विकून रब्बीची पेरणी केल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील दादा दौड यांच्या गाठीला पैसा राहिला नाही. आता पुढील हंगामातील पेरणीला पैसा कुठून आणायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शनिवारी दुपारी बारा वाजता शेतातील विहिरीत उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह दुपारी विहिरीतून बाहेर काढण्यात आला; परंतु संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पानवडोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने शवविच्छेदन होऊ शकले नाही. पानवडोद आरोग्य केंद्रातातील वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

सावकारी कर्जाचा डोंगर
कळंब तालुक्यातील बालाजी बागल यांच्या पिकांचे गारपिटीमुळे नुकसान झाले. कर्जामुळे सावकार तगादा लावत होता. मात्र, परतफेड होणार नसल्यामुळे बागल यांनी शनिवारी घरातील पत्र्याच्या आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली.

रब्बीसह फळबागही गेली
कर्जाचा बोजा वर गारपिटीने उद्ध्वस्त झालेली फळबाग तसेच रब्बी पिकांमुळे कळंब तालुक्यातील देवळाली येथील 36 वर्षीय तरुण शेतकरी राजेंद्र हरिश्चंद्र लोमटे याने शुक्रवारी पहाटे पेट्रोल ओतून पेटवून घेतले. तो 96 टक्के भाजला. त्याच्यावर लातूर येथे उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. राजेंद्र पदवीधर असून त्याच्या नावावर 4 एकर जमीन आहे. त्यांनी 1 हेक्टर आंब्याची लागवड केली होती. शेतात गहू, ज्वारी, हरभराही पेरला होता. मात्र, गारपिटीने सर्वच उद्ध्वस्त झाले.