आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच बैठका केवळ पावणेतीन तासांत उरकल्या; पालकमंत्र्यांच्या शैलीत लक्षणीय बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालकमंत्री दिवाकर रावते, महादेव जानकर यांनी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. - Divya Marathi
पालकमंत्री दिवाकर रावते, महादेव जानकर यांनी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
उस्मानाबाद- बळीराजा चेतना अभियान, मोतीरामजी लहानेे कृषी समृद्धी प्रकल्प, जिल्हा दक्षता पुरवठा समिती, दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना आदी महत्त्वपूर्ण बैठका येथे रविवारी (दि.२८) केवळ पावणेतीन तासांत उरकण्यात आल्या. डीपीडीसीच्या बैठकीत विशेष योजनांवर चर्चाच झाली नाही. यामुळे आक्रमक शैलीच्या पालकमंत्र्यांमध्ये केवळ दीड महिन्यात लक्षणीय बदल झाल्याचे दिसून आले. एरव्ही कामचुकार अधिकाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या दिवाकर रावते यांनी विवध बैठका उरकण्यावर भर दिला. 

जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियानात भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना एकाही अधिकाऱ्याला त्यांनी जाब विचारला नाही. पालकमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर रावते यांनी एप्रिल रोजी बळीराजा चेतना अभियान, धान्य वितरण व्यवस्था, वनविभाग यासह पाच बैठका घेतल्या होत्या. यामध्ये रावते यांनी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होत होऊनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्यामुळे आरोग्य, महसूल, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा विभागातील कामचुकार अधिकाऱ्यांची त्यांनी लक्तरे काढली होती. 

रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी विविध अभियान योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. बैठकीत अधिकाऱ्यांना केवळ सल्ले देण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या बैठका दुपारी १.४५ वाजेपर्यंत आटोपल्या. पालकमंत्र्यांनी औपचारिकता पार पाडल्याची चर्चा सुरू होती. दुपारी वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यामध्येही नेहमी चर्चिले जाणारे विषय मागील बैठकीच्या अनुपालनावरच चर्चा झाली. रावतेंसह बैठकींमध्ये सहपालकमंत्री महादेव जानकर, आमदार ज्ञानराज चौगुले, मधुकराव चव्हाण, सुजितसिंह ठाकूर, राणाजगजितसिंह पाटील, राहुल मोटे, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ. रूपाली सातपुते, कार्यकारी अभियंता शिवाजी थोरात, विभागीय वन अधिकारी राजेश्वर सातेलीकर, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी शिरीष जमदाडे, डॉ. एकनाथ माले, सुधाकर आडे, सोमनाथ रेड्डी उपस्थित होते. 

ग्रामीण बँकेतून कर्जवाटप
महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीककर्जाचे वाटप होत नसल्याने अन्य राष्ट्रीयीकृत बँकेकडे दत्तक गावे वर्ग करण्याची मागणी आमदार राणा पाटील यांनी केली होती. यावर बँक प्रशासनाने उद्दिष्टपूर्तीची हमी दिल्याचे सांगितले. तेरला संत गोरोबाकाका मंदिराची ओव्हरी, यात्री निवासाचे काम, उस्मानाबादेत महिला रुग्णालयाला संरक्षक भिंत सोनोग्राफी यंत्रासाठी निधी उपलब्ध करण्याचीही मागणी पाटील यांनी केली. ती मंजूर केली आहेत. 

सेवानिवृत्त तलाठी त्रस्त शेतकरी? 
बळीराजा चेतना अभियानातून त्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली आहे. मात्र, याची खातरजमा करता मर्जीतील लोकांना मदत दिली असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला. रुईभर येथील एका सेवानिवृत्त तलाठ्यालाच त्रस्त शेतकरी म्हणून पैसे देण्यात आल्याचे दाखविले आहे, असे त्यांनी सांगितले. नियोजन समिती बैठकीत आमदार चव्हाण यांनी रिचार्ज शाफ्ट, वनविभागाचे डीपसीसीटी, मातीनाला बांधकाम, बांधकाम विभाग वन्यजीव संरक्षकांनी केलेली ही कामे निकृष्ठ दर्जाची असून याची चौकशी करण्याची मागणी आमदार चव्हाण यांनी केली. 

अभियान, लॅपटॉप खरेदीची चौकशी 
आमदारठाकूर यांनी मागणी केल्यानंतर झेडपी समाजकल्याण विभागातील लॅपटॉप खरेदी प्रकरण,आमदार चव्हाण यांच्या अन्य लोकप्रतिनिधींच्या मागणीवरुन बळीराजा चेतना अभियानाच्या खर्च झालेल्या निधीची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री रावते यांनी दिले आहेत. 

१३५ कोटींचा आराखडा 
जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर आडे यांनी वार्षिक योजनेचे सादरीकरण केले. २०१६-१७ साठी १७४ कोटी ९२ लाख, अनुसूचित जातीसाठी ६२ कोटी ९२ लाख तर आदिवासी क्षेत्राबाहेरील अादिवासींकरिता दोन कोटी १५ लाख ५७ हजार मंजूर नियतव्यय असल्याचे सांगितले यावर्षीसाठी मात्र, १३५ कोटी ५८ लाख किंमतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झेडपी, नगरपरिषद सदस्यांचा समावेश असतो. मात्र, दोन्ही संस्थातील सदस्यांची समितीवर निवड झाली नसल्याने जुन्या सदस्यांना निमंत्रण हवे होते. ते नसल्याने या संस्थांसंबंधीत प्रश्न चर्चेविना राहिले. 
 
अभियानाच्या निधीतून बियाणे 
बळीराजा चेतनातून बियाणे खरेदीसाठी मदतीचे निर्देश रावते यांनी दिले. अभियान जिल्ह्यात पथदर्शी असल्याने अनुभव, निरीक्षण नोंदविण्याचा आग्रह त्यांनी केला. शेतकऱ्यांना विम्याची सूचनाही केली. 
बातम्या आणखी आहेत...