आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलप्रलयाचे संकट: कुरुक्षेत्रातील भाविकांना परतीचे तिकीट मिळेना !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - उत्तराखंडमधील महाप्रलयाचा फटका जालना जिल्ह्यातील 40 यात्रेकरूंना बसला. काही जण यात्रा अर्धवट सोडून घरी परतण्यासाठी आतुर झाले आहेत. मात्र, यात्रेकरूंची परत येण्याची व्यवस्था होत नसल्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी थांबावे लागत आहे. जालना येथून 10 जून रोजी उत्तर भारतात यात्रेसाठी गेलेल्या लक्ष्मण गिते दांपत्याची अशीच स्थिती आहे. जालन्यात परतण्यासाठी 21 जूनचे रेल्वे तिकीट कन्फर्म झाल्याचे यात्रा कंपनीकडून त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे तीन दिवस कुरुक्षेत्र येथेच त्यांना मुक्काम करावा लागणार आहे.


लक्ष्मण गिते यांच्यासोबत त्यांची पत्नी मीना आहेत. जिल्ह्यातून 40 भाविक उत्तर भारतात यात्रेसाठी गेले आहेत. यापैकी 35 जणांशी संपर्क झाला असून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. शिवाय, जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मात्र, 15 भाविकांशी संपर्क झाला नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.


यातील काही यात्रेकरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता जालना शहरातील कांचननगर भागातील लक्ष्मण गिते यांच्याशी संपर्क झाला. 10 जून रोजी ते जालना येथून सचखंड एक्स्प्रेसने निघाले. दुस-या दिवशी दुपारी 11.15 वाजता मथुरा ते येथे पोहोचले होते.


दरम्यान, त्यांनी दोन दिवस मथुरा, वृंदावनमधील विविध ठिकाणच्या देवस्थानांना भेटी दिल्या. त्यानंतर वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन बुधवारी सकाळी 6 वाजता कुरुक्षेत्रला पोहोचले. नद्यांना आलेले महापूर, रस्ते, पूल वाहून गेल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल., परिणामी उर्वरित देवस्थानांच्या ठिकाणी जाणे अशक्य असल्याचे यात्रा कंपनीकडून सांगण्यात आले. यामुळे त्यांनी पुढील प्रवास रद्द करून लगेचच जालन्याला परतण्याचा निर्णय घेतला. मात्र, चौधरी यात्रा कंपनीकडून तिकीट कन्फर्म होत नसल्यामुळे कन्फर्म होईपर्यंत त्यांना कुरुक्षेत्रातच थांबावे लागणार आहे.


हरिद्वारला जाणे रद्द
आम्ही आठ दिवसांत मथुरा, वृंदावन, अमृतसर, वैष्णोदेवी, कुरुक्षेत्र ही देवस्थाने पाहिली. 20 जून रोजी आम्हाला हरिद्वारला जायचे होते. मात्र, उत्तराखंडमधील गंभीर परिस्थितीमुळे तिकडे जाणे शक्य नसल्याचे यात्रा कंपनीकडून सांगण्यात आले. आता आम्ही जालन्याला परतण्याचा निर्णय घेतला असून परतीचे तिकीट काढून देण्याचे यात्रा कंपनीला सांगितले आहे.
लक्ष्मण गिते, कांचननगर, जालना


2 दिवसांनंतरचे तिकीट
10 जून रोजी यात्रेकरू उत्तर भारतात गेले होते. उत्तराखंडमधील पूरस्थितीमुळे विविध ठिकाणचे यात्रेकरू आपापल्या गावी परतीच्या वाटेवर आहेत. मात्र, प्रचंड गर्दी होत असल्यामुळे प्रशासनाकडून तिकीट काढण्यात येत आहे. 10 जून रोजी गेलेल्या यात्रेकरूंचे 21 जून रोजी सकाळच्या रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले आहे.
सत्यनारायण चौधरी, संचालक, चौधरी यात्रा कंपनी, मुख्य कार्यालय, नाशिक