आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पालवणच्या छावणीत साजरा होणार पोळा सण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मागील तीन वर्षांपासून कमी पडत असलेल्या पावसामुळे ओढवणारे दुष्काळाचे संकट, कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे शेतकरी पुरता खचून गेला आहे. शेतकऱ्याला सावरण्यासाठी बीड तालुक्यातील पालवण येथे यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या छावणीत यंदा प्रथमच पोळ्याचा सण होणार आहे. शनिवारी दुपारी दीड हजार बैलांची बीड शहरातून मिरवणूक काढण्यात येणार असून शेतकऱ्यांना फेटे बांधून त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

मागील अडीच महिन्यांपूर्वी दडी मारून बसलेला पाऊस परतीला जिल्ह्यात बरसू लागला आहे. खरीप हंगाम पुरता वाया गेला आता शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगावरच आहे. गुरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न एेरणीवर आला आहे. बीड तालुक्यातील पालवण या गावात शिवसंग्रामचे राज्य युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दुष्काळात गुरे जगवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ सप्टेंबरपासून गुरांची छावणी सुरू केली. तालुक्यातील २३ गावांतील दीड हजार शेतकऱ्यांचे बैल, गायी, म्हशी अशी तीन हजार गुरे छावणीत जगत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी गुरांसोबतच छावणीत राहण्याची व्यवस्था केली आहे. ३५ एकरांत ही छावणी असून प्रत्येक छावणीत गुरांसाठी स्वतंत्र सिंटेक्सची टाकी असून थेट टाकीत पाणी सोडले जात आहे.

छावणीत येणाऱ्या गुराची तपासणी करून त्याचे लसीकरण करण्यात येत असून १२ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली आहे. आजपर्यंत दोन हजार गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे. रोज दोनशे गुरांचे लसीकरण छावणीत होत आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार विनायक मेटे यांनी या चारा छावणीला भेट देऊन कौतुक केले होते. गुरे जगवण्यासाठी चालकांची ही धडपड असून प्रति गुरामागे केवळ ७० रुपये मिळत असल्याने छावणी चालवणे कसरतीचा खेळ आहे.

मिरवणुकीनंतर बैलांचे विवाह
पालवण येथील गुरांच्या छावणीत सध्या गायी व बैलांची संख्या १२०० च्या आसपास आहे. पोळ्याच्या दिवशी बैलांची संख्या वाढणार असून चऱ्हाटा फाटा ते बशीरगंज मारुती मंदिर अशी बैलांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाणार अाहे. यात शेतकऱ्यांना सहभागी करून घेत त्यांना फेटे बांधले जाणार आहे. मिरवणुकीनंतर छावणीतच पूजा करून शास्त्रोक्त पद्धतीने बैलांचे विवाह लावले जाणार आहेत.

आणखी दोन हजार गुरे दाखल होणार
पालवण येथील गुराच्या छावणीत सध्या तीन हजार गुरे असून पोळ्यानंतर आणखी दोन हजार गुरे दाखल होणार आहेत. सध्या या छावणीत मोठ्या गुरास पंधरा किलो ओला चारा, तर लहान गुरास साडेसात किलो चारा दिला जात असून यासाठी परळी, माजलगाव, येथून रोज ५० टन ऊस आणला जात असून यासाठी एक लाख ४० हजार रुपये खर्च येत आहे. पाण्यासाठी सध्या १८ टँकर असून बीड येथील लहू शेठ मुळूक यांच्या विहिरीतून पाणी घेतले जात आहे.

पोळ्यानंतर जेवणाची व्यवस्था
छावणीत गुरे असणाऱ्या शेतकऱ्यांची आम्ही तीन वर्षांपूर्वी जेवणाची व्यवस्था केली होती. यंदाही पोळ्याच्या दुसऱ्या दिवसापासून दीड हजार शेतकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. दुष्काळामुळे शेतकरी निराश होऊन आत्महत्या करत आहेत. हे पाहवत नाही. शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी आम्ही त्यांना सहभागी करून पाेळा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राजेंद्र मस्के, छावणी चालक, पालवण