आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Food Administration Raided On Gutkha Factory In Nanded

नांदेडमध्ये गुटख्याच्या कारखान्यावर अन्न प्रशासनाचा छापा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - शहरापासून जवळच असलेल्या धनेगाव शिवारातील शेतात शुक्रवारी दुपारी अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी बनावट गुटखा बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला. या कारखान्यातून उत्पादन सुरू होण्यापूर्वीच या कारखान्यावर धाड टाकण्यात आली.

धनेगाव शिवारात पुनाजी भालके (रा. धनेगाव) यांचे दोन एकर शेत आहे. या शेतात आठ दिवसांपूर्वीच एक शेड टाकण्यात आले. या शेडमध्ये बनावट गुटखा बनवण्यासाठी पाच नवीन मशीन बसविण्यात आल्या. याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला यापूर्वीच लागली होती. त्यांनी या कारखान्यातील हालचालीवर नजर ठेवली होती. कारखान्यासाठी उभारलेल्या शेडमध्ये मशीन फिट झाल्यानंतर उत्पादनाला सुरुवात करण्याच्या तयारीत असतानाच अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे, सहायक बालाजी सोनटक्के यांनी या कारखान्यावर धाड टाकली. त्यानंतर नांदेड ग्रामीण पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अधिकार्‍यांनी धाड टाकल्यानंतर सर्व जण फरार झाले. कारखान्यात कोणीही नव्हते.

अधिकार्‍यांना जिवे मारण्याचा प्रयत्न
धनेगाव शिवारातील बनावट गुटखा फॅक्टरीवर धाड टाकण्यासाठी अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे व त्यांचे सहायक बालाजी सोनटक्के गेले असता त्यांच्या अंगावर टाटा कंपनीच्या (छोटा हत्ती) गाड्या घालून जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. पिवळ्या रंगाच्या या गाड्यांचे क्रमांक एमएच 26 एडी 6625 व एमएच 26 एडी 6626 असे होते.

अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गाड्या अंगावर येत आहेत असे पाहून आम्ही बाजूला झालो. अवघ्या 1 इंच जवळून या गाड्या सुसाट वेगाने निघून गेल्या.