आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसंधारणाला द्या तंत्राची जोड- भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- पूर्वी दहा-वीस फुटांवर असलेले पाणी बेसुमार उपशामुळे खोल गेले आहे. बोअरची खोली वाढवण्याची जणू स्पर्धा लागली आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी तंत्र आधारित जलसंधारणाची गरज आहे. पावसाचे पडणारे पाणी नाल्यांची लांबी-रुंदी-खोली अडवून साठवले आणि ते योग्य पद्धतीने जमिनीत मुरवले तर राज्यातील महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्या कायमच्या संपतील, असा दावा वरिष्ठ भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी केला. खानापूरकर जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नचे जनक आहेत. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

खानापूरकर यांनी या वेळी पाणी समस्या आणि त्यावर शिरपूरमध्ये केलेले प्रयोग या विषयावर मनोगत व्यक्त केले. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे त्यांनी पाण्याची समस्या काय आहे, तिचे परिणाम काय होतील आणि ती आटोक्यात आणण्यासाठी काय प्रयोग करावे लागतील याचा परामर्श घेतला. ते म्हणाले, पावसाचे 90 टक्के पाणी वाहून जाते. दुसरीकडे उद्योग, शेतीसाठी पाण्याची मागणी वाढत आहे. मात्र, ते अपुरे पडत चालले आहे. गेल्या शंभर वर्षांतील पावसाचा अभ्यास केला तर पाऊस कमी झालाय, असे दिसत नाही. मात्र, तो अनियमित पडत आहे. दुसरीकडे मोठ्या प्रमाणातील उपशामुळे जमिनीच्या पहिल्या व दुस-या स्तरातील पाणी संपून गेले आहे. सध्या आपण तिस-या स्तरातील पाणी वापरत आहोत. वर्ष-दोन वर्षांत तेही संपून जाईल. त्या वेळी आज बीड-उस्मानाबाद-जालन्यात असलेले चित्र सबंध राज्यात असेल. आजमितीस 2500 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. मे महिन्यात याची संख्या दुप्पट झालेली असेल. मात्र, टँकर लावून आणि विहिरींचे अधिग्रहण करून प्रश्न सुटणारे नाहीत. त्यासाठी कायमस्वरूपी योजना आखावी लागेल, असेही ते म्हणाले. झेडपी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर, माजी आमदार पाशा पटेल यांची या वेळी उपस्थिती होती.

काय आहे शिरपूर पॅटर्न - शिरपूरमध्ये आमदार अमरीश पटेल यांनी त्यांच्या प्रियदर्शिनी सूतगिरणीच्या माध्यमातून पाच वर्षांपूर्वी खानापूरकर यांची वरिष्ठ भूवैज्ञानिक म्हणून नेमणूक केली. त्यांच्याकडे दोन कोटींचा निधी आणि दोन पोकलॅन आणि चार टिप्पर दिले. त्यासाठी लागणारे मनुष्यबळही पुरवले. त्याच्या साहाय्याने खानापूरकर यांनी शिरपूर तालुक्यातील 35 गावांमध्ये बुजलेले नाले मोठे केले. त्यावर गेट नसलेले बंधारे बांधले. त्यामुळे या भागातील सलग तीन वर्षे कमी पाऊस पडल्यानंतर आजही पाणी टिकून आहे. 200 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि सहा मीटर खोल असे नाल्याला स्वरूप देण्यात आले. त्यावर बंधारा बांधण्यात आला. अशा एका बंधा-यात 14400 घनमीटर पाणी थांबले. तीनशे मीटर लांबीच्या नाल्यावरील बंधा-यात 28800 घनमीटर पाणी थांबले. दोन्ही पद्धतीचे असे 200 बंधारे 35 गावांमध्ये बांधले. त्यामुळे या भागाचा कायापालट झाला.

शेतक-यांनी एकत्र यावे - पुढच्या पिढीचे भवितव्य आज आपल्या हातात आहे. आपण वेळीच जागे झालो नाही तर भविष्यात प्यायलाही पाणी राहणार नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या मागे लागून शिरपूर पॅटर्न आपल्या भागात राबवण्यासाठी शेतक-यांनी एकत्र यावे. नेते ऐकत नसतील तर थेट लोकवर्गणी करून ही कामे करून घ्यावीत.’’ - सुरेश खानापूरकर, भूजलतज्ज्ञ

नाल्यांची रुंदी-खोली वाढवा- नाल्याच्या उगमापासून नदीच्या संगमापर्यंत नाल्यांची लांबी-रुंदी-खोली वाढवली तर प्रत्येक शेतक-याला आपल्या शेतापासून 500 मीटर अंतरावर पाणी मिळेल. यामध्ये कसलेही भूसंपादन, विस्थापन, पुनर्वसन असे प्रकार नाहीत. तसेच बारमाही पाणी, शेतरस्ते, मत्योत्पादन, पिण्याचे पाणी, शेतीला दोन पिके घेण्याएवढे पाणी उपलब्ध झाल्याचे खानापूरकर यांनी चित्रफितीद्वारे दाखवले.