आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
लातूर - चोरी होऊ नये म्हणून कितीही काळजी घेतली तरी चोरटे अफलातून बुद्धीचा वापर करीत गुन्हेगारी कृत्याला मूर्तस्वरूप देत असल्याचा प्रकार लातुरात घडला. मंगळवारी पहाटे मुख्य रस्त्यावरील दोन दुकाने जॅकच्या साहाय्याने फोडून नगदी रक्कम आणि माल लांबवला. या घटनेमुळे लातूरच्या बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.
मिनी मार्केटजवळ मेन रोडवर असलेल्या व्यापारी संकुलातील अदिदास कंपनीचे शोरूम चोरट्यांनी पहाटे तीन ते पाच या वेळेत शिताफीने फोडले. शोरूमच्या शटरला दोन्ही बाजूला कुलूपे लावण्यात आली होती. मात्र, सेंट्रल लॉक तसेच होते. मुळात या दालनाचे शटर इतके जाड आहे की, त्याला उचलण्यासाठी दोन माणसांचा आधार घ्यावा लागतो. चोरट्यांनी त्यासाठी नामी शक्कल लढवली. शटरच्या मधोमध पहार (सब्बल) लावून मालवाहू ट्रकचे चाक काढण्यासाठी वापरण्यात येणारे जॅक लावण्यासाठी जागा केली. त्यानंतर जॅकच्या आट्या चढवत चोरटा आतमध्ये जाईल इतके वर शटर मध्यभागातून उचलले.
दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी शूज, टीशर्ट, स्पोर्टचे साहित्य असा जवळपास एक लाखाचा ऐवज लुटून नेला. या संदर्भात अदिदास शोरूमचे लातुरातील व्यवस्थापक वसीम शेख यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशीच पद्धत वापरून चोरट्यांनी मंगळवारी पहाटे बार्शी रस्त्यावरील उषाकिरण सिनेमा संकुलातील इलेक्ट्रॉनिक दुकान फोडून तीस हजारांची नगदी रक्कम लंपास केली. उमाकांत पेन्सलवार यांच्या उषाकिरण इलेक्ट्रॉनिक्सया दुकानात हातसफाई करण्यात आली. पेन्सलवार यांच्या दुकानाचे दोन गाळे आहेत. या दोन्ही गाळ्यांचे शटर अदिदासच्या दालनाप्रमाणेच फोडून आत प्रवेश मिळवला. या प्रकरणी लातूर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्लोव्हज घालून चोरी
चोरी झालेली दोन्ही दुकाने मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी आहेत, तरीही चोरट्यांनी अफलातून शक्कल लढवून आपला उद्देश साध्य केला. उषाकिरण व्यापारी संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यात आपला चेहरा दिसू नये म्हणून चोरट्यांनी काळजी घेतली होती. त्यामुळे एक चोरटा कॅमे-यात कैद झाला असला तरी अंधारामुळे त्याचा चेहरा ओळखूच येत नाही. हाताचे ठसे सापडू नयेत म्हणून त्यांनी ग्लोव्हज घातले होते. पेन्सलवार यांच्या काउंटरचे तिन्ही ड्रॉवर्स झटक्यात तोडले आणि आतील पैसे घेऊन पसार झाले.
तपासासाठी एलसीबीची मदत
चोरीचा तत्काळ तपास करण्यासाठी दोन्ही ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत, तरीही गुन्हे करण्याची पद्धत थोडीशी वेगळी असल्याने एलसीबी (लोकल क्राइम ब्रँच)ची मदत घेतली जाणार आहे. मागच्या काळात शटर उचकटून चोरी झाली होती. त्यादिशेने तपास केला जाणार आहे. बी. जी. गायकर, पोलिस अधीक्षक, लातूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.