आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसव्या ‘बेटी बचाओ’ योजनेचा एक फॉर्म विकला शंभर रुपयांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- “प्रधानमंत्री बेटी बचाओ’ योजनेच्या नावाने ६ ते ३२ वर्षांच्या मुलींच्या नावे दोन लाख रुपये जमा होणार असल्याची अफवा अंबाजोगाईत पसरली आहे. या फसव्या योजनेचे फॉर्म  शहरातील  एका झेरॉक्स चालकाने छापून ते शंभर रुपयांना एक याप्रमाणे  विकले. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट सांगण्यात आल्याने गुरुवारी सकाळपासून येथील पोस्टात लोकांनी गर्दी केली होती. रजिस्टर पोस्टाने हा अर्ज पाठवण्यासाठी पोस्टाला ८० हजारांचे उत्पन्न मिळाले, एवढा या फसव्या योजनेचा फायदा झाला. 

“प्रधानमंत्री बेटी बचाओ’ योजनेची अंबाजोगाईत अफवा पसरल्याने अनेक झेराॅक्स सेंटरमधून चढ्या दराने फॉर्मची विक्री झाली आहे. अर्जात  मुलीचे नाव, आधार क्रमांक, शैक्षणिक पात्रता, जन्मदिनांक, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, बँक खाते, आयएफसी कोडसहित भरून त्यावर नगरसेवक अथवा सरपंचाचा शिक्का व सही घेऊन जवळच्या पोस्ट कार्यालयामार्फत भारत सरकार महिला एवं बालविकास मंत्रालय, शांती भवन, नवी दिल्ली-११० ००१ या पत्त्यावर पाठवण्याचे सांगितले होते. हा अर्ज हिंदी भाषेतून असला तरी खालील नोट मात्र मराठीत असल्याने अर्जच  बोगस असल्याचे स्पष्ट झाले.  येथील हजारो पालकांनी पोस्ट ऑफिसमध्ये रजिस्ट्री करण्यासाठी गर्दी केली होती. अंबाजोगाईतील एका झेरॉक्स  सेंटर चालकाने  हा अर्ज आपल्या सेंटरचा शिक्का मारून पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत विक्री केला.  पोस्टातील गर्दी पाहून शेवटी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोस्ट खात्याला पोलिसांना बोलवावे लागले. परळीसह अंबाजोगाई टपाल कार्यालयात  चक्क दोन हजार अर्जांची रजिस्ट्री पोस्ट झाले आहेत.   

पोस्टाला फायदा  
या फसव्या योजनेच्या नावावर परळीसह अंबाजोगाई टपाल कार्यालयात दोन हजार अर्जांची रजिस्ट्री झाली आहे. दुपारी तीन वाजता बंद होणारे टपाल कार्यालय गुरुवारी मात्र रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहिले. जवाबी रजिस्ट्रीमुळे टपाल कार्यालयाला ८० हजारांचा फायदा झाला.

उत्तर प्रदेश,  हरियाणात योजनेचे पेव    
उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंडमध्ये  या योजनेचे पेव फुटले होते. तेव्हा महिला व बालविकास मंत्रालयाच्या सचिव लीना नायर यांनी अशा प्रकारची केंद्र सरकारची योजनाच नसून ही अफवा आहे. सध्या महाराष्ट्रात या अफवेने धुमाकूळ घातला आहे. झेरॉक्स चालकांनी अशा योजनेचे अर्ज तयार करून सामान्यांसह प्रशासनाची धावपळ उडवून दिली आहे.

रात्री दहापर्यंत सुरू होते पोस्ट    
अंबाजोगाईच्या  शिवाजी चौकातील पोस्ट ऑफिस  गुरुवारी  दुपारी एकनंतर महिला व पुरुषांच्या गर्दीने भरुन गेले.  प्रत्येक जण या योजनेच्या फॉर्मची रजिस्ट्री करण्यासाठी आला होता. ही योजना बोगस असल्याचा फलक कार्यालयाबाहेर लावण्यात आला. तरीही लोक एेकायलाच तयार नव्हते. त्यामुळे सर्वांचे पॉकेट स्वीकारून रात्री दहापर्यंत रजिस्ट्री करण्यात आल्या.   
- भगवान होळणे, पोस्टमास्तर, अंबाजोगाई.   
बातम्या आणखी आहेत...