आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाधी देशसेवा, आता सामाजिक बांधिलकीचे पाऊल: शेतकऱ्यांसाठी माजी सैनिकांची मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दुष्काळाचे संकट असताना शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारू नये यासाठी बीड येथील पाच माजी सैनिक मित्र सरसावले असून प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांचे सामाजिक प्रबोधन करण्याबरोबरच त्यांच्या मुलांना भारतीय सैन्य दल व पोलिसमध्ये संधी मिळण्यासाठी मोफत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. अाधी देशसेवा व सेवानिवृत्तीनंतर उचललेले सामाजिक बांधिलकीचे पाऊल प्रेरणादायी ठरत आहे.

गेवराई तालुक्यातील खळेगावचे मूळ रहिवासी असलेले मधुकर साळवे हे सध्या शहरातील एकनाथनगर येथे राहत असून ते वयाच्या अठराव्या वर्षी भारतीय सैन्य दलात दाखल झाले. १९८३ ते २०११ अशा २८ वर्षांत देशसेवा केली असून २००२ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या रिक्सी ऑपरेशमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. पुढे कारगिल ऑपरेशन मोहिमेत ते सेकंड प्यारा बटालियनमध्ये राखीव होते. जून २०११ मध्ये ते सेवानिवृत्त झाल्यांनतर पुढे शेती करण्याचा त्यांचा विचार त्यांच्या मनात आला होता. परंतु पाच एकर कोरडवाहू शेती दुष्काळात सापडल्याने आता पुढे काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. जिल्ह्यात कर्जबाजारीपणा, नापिकी या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांत प्रकाशित होत असल्याचे पाहून साळवे हे व्यथित झाले. शेतकऱ्यांसाठी काही तरी केले पाहिजे यासाठी त्यांनी माजी सैनिक मित्र राहुल तांदळे, धर्मराज ससाने, अनिल मस्के, विजय तरकसे यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी व त्यांच्या मुलांसाठी विशेष काम करण्याचा मनोदय व्यक्त केला. जिल्ह्यातील प्रत्येक दुष्काळी गावाला भेट देऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी स्वखर्चाने त्यांनी भेटीगाठी सुरू केल्या. चाळीस गावांतून एक रुपयांप्रमाणे सध्या त्यांच्याकडे सहा हजार रुपये जमा झाले असून ते शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

बीड तालुक्यातील दगडीशहाजानपूर या गावापासून साळवे यांच्यास चार मित्रांनी २४ ऑगस्ट २०१५ पासून शेतकऱ्यांच्या प्रबोधनाला सुरुवात केली. एकाच दिवशी पाच मित्र वेगवेगळ्या गावात जात असून प्रथम गावातील सरपंचाची भेट घेतात.

नोकरभरतीसाठी प्रशिक्षण
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची मुले भारतीय सैन्य दल व पोलिसात भरती व्हावेत यासाठी माजी सैनिक मित्रांनी शहराजवळील पालवण चौकात फिजिकल व थेअरी परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. बीड शहरासह पिंपळवंडी, चुंभळी, आमला, वाहेगाव, ढोकवडगाव, येथील ३५ मुलांची सध्या तयारी करून घेतली जात आहे.

एक रुपया लोकवर्गणी
दुष्काळात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गावोगावी जाणारे माजी सैनिक प्रत्येक एका ग्रामस्थाकडून फक्त एक रुपया घेत असून जमा झालेली मदत दुर्बल शेतकऱ्यांना दिली जाते. बीड येथे त्यांनी स्थापन केलेल्या विठ्ठल रखुमाई सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना ही मदत दिली जाते.