आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहाला भोजन पुरवणाऱ्या ठेकेदारासह चार जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातुरात समाज कल्याण विभागाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृहातील जवळपास १५० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्यानंतर भोजन पुरवणारा ठेकेदार व स्वयंपाक्यांवर जीवितास धोका होईल, असे कृत्य करणे व हलगर्जीपणा केल्याबद्दल येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.

सदर वसतिगृहात अकरावी ते पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची सोय असून त्यात एक हजार मुले राहण्याची सोय आहे. मुले व मुलींसाठी हे वसतिगृह असून रविवारी जवळपास ६५० विद्यार्थी होते. दुपारच्या सुमारास मुलांनी जेवण केल्यानंतर काही जणांना मळमळ सुरू झाली. त्यामुळे बाधा झालेल्या मुलांनी तेथीलच एका खासगी दवाखान्यात उपचार घेतले, परंतु मळमळ होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री दहा वाजेपर्यंत जवळपास ३०० मुले दाखल झाले होते.

रुग्णालयात १५० जणांना दाखल करून उपचार करण्यात आले तर उर्वरित मुलांना औषध गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले. दाखल झालेल्या मोजक्या मुलांना उलटीचा त्रास तर बहुतांश विद्यार्थ्यांना मळमळ होत होती. सर्व मुलांना रात्री उशिरा घरी पाठवण्यात आले तर चार मुलींना सोमवारी दुपारी सुटी देण्यात आली. विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याचा उलगडा होण्यासाठी रुग्णालयाने अन्नाचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

वसतिगृहाला भोजन पुरवण्याचा ठेका लातुरातील तेजल ट्रेडर्स या ठेकेदाराला देण्यात आला असून रविवारी विद्यार्थ्यांना दोडका, कोबीची भाजी, वरण, भात, लोणचे, दही आणि पोळी असा आहार देण्यात आला होता. हे भोजन भीमराव कांबळे या स्वयंपाक्याने बनवले होते. दरम्यान, समाज कल्याण विभागाने ठेकेदाराकडून येणारे जेवण बंद केले असून सोमवारी अन्य ठिकाणांहून मागवून ते मुलांना देण्यात आले.

पोलिसांत अपुरी तक्रार
यासंदर्भात समाजकल्याण विभागाच्या वतीने पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. त्यात ठेकेदाराचा फक्त देशमुख इतकाच उल्लेख आहे. गोविंद जाधव, भीमराव कांबळे व लक्ष्मण कोकाटे या स्वयंपाक्यांना आरोपी करण्यात आले आहे. शिवाय नाव न टाकता काही अन्य म्हणून तक्रारीत नोंद आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुन्हा झुरळ निघाल्याचा आरोप
विषबाधा झाल्यानंतर सोमवारी समाज कल्याण विभागाने तात्पुरत्या स्वरूपात काही दिवसांसाठी दुसऱ्या ठेकेदाराकडून जेवण मागवले, परंतु त्यातही झुरळ निघाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यामुळे सदर ठेकेदाराने आज रात्री जेवण देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची बैठक घेऊन जेवणासाठी मिळणारी रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याचा प्रताव पाठवण्यात येणार असल्याची माहिती समाज कल्याण उपायुक्त लक्ष्मण वाघमारे यांनी दिली.

दुपारी कारवाई
शासकीय वसतिगृहातील विषबाधेप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत चार आरोपींना अटक केली आहे. त्यात विठ्ठल गोपीनाथ देशमुख आणि गोविंद हरिराम जाधव या ठेकेदारासह भीमराव कांबळे व अजय शिंदे या स्वयंपाक्यांचा समावेश आहे.

अहवालानंतर पुढील कारवाई
समाज कल्याण विभागाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येऊन पुढील तपास सुरू आहे. अन्नात नेमकी विषबाधा कशामुळे झाली, याचा अहवाल अन्न व औषध प्रशासनाकडून मागवण्यात आला आहे. त्यानंतर कलमांत वाढ होईल, अशी माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक इंगेवाड यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...