आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत येत्या दोन दिवसांत पावसाची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - हवेतील सापेक्ष आर्द्रतेत सर्वसाधारण आर्द्रतेपेक्षा मोठी वाढ झाल्याने ढगाळ वातावरण राहू लागले आहे. परिणामी आगामी दोन दिवसांत मराठवाड्यातील परभणीसह बीड, लातूर व औरंगाबाद या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान केंद्राने वर्तवली आहे. या वातावरणाचा परिणाम तुरीवर झाला असून काही भागात तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
दिवाळीनंतर थंडीची चाहूल लागलेली असतानाच मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण राहू लागले आहे. हवेतील सापेक्ष आर्द्रता मराठवाड्यात साधारणत: ६२ ते ७० टक्के असते, परंतु तीन दिवसांत ती ८२ टक्क्यांवर पोहोचल्याने उकाडा जाणवत आहे. वातावरणातील या बदलाने ढगाळ वातावरण राहू लागले आहे. वाऱ्याची गती ताशी नऊ किलोमीटर असते, परंतु या गतीतही बदल झाल्याने सध्या ताशी चार ते पाच किलोमीटर एवढीच वाऱ्याची गती असल्याने आगामी दोन दिवसांत पावसाची शक्यता कृषी हवामान केंद्राने वर्तवली आहे. परिणामी परभणीसह बीड, लातूर व औरंगाबाद या चार जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. परभणीत चार मिलिमीटर, तर अन्य तीन जिल्ह्यांत पाच ते सहा मिलिमीटर पाऊस होण्याची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली व जालन्यात याचा फारसा परिणाम जाणवणार नाही.
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव
आर्द्रता वाढल्याचा परिणाम सर्वाधिक तुरीवर झाला असून काही ठिकाणी तुरीवर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तूरडाळीच्या भावात वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना हे दर परवडेनासे झाले आहेत. मराठवाड्यातील सर्वच भागांत येत्या काही दिवसांत तुरीवरील अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुरीचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण रब्बीतील ज्वारीसाठी पोषक ठरणार आहे. हलक्या पावसानंतर थंडीत वाढ होणार असल्याचा अंदाज आहे.
तापमान घसरले..
चार दिवसांपूर्वी किमान तापमान १४ ते १५ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहू लागले होते. त्यामुळे थंडीची चाहूल लागली होती. मात्र, मंगळवारी (दि. २४) यात वाढ होऊन ते २१.५ अंश सेल्सियस झाले. परिणामी थंडी गायब झाली आहे, तर कमाल तापमान ३३ अंश सेल्सियसपर्यंत नोंदले गेले आहे. कमाल तापमान सर्वसाधारण राहू लागले आहे.
ए. आर. शेख, वेधशाळा निरीक्षक, हवामान केंद्र